देवेंद्र कोल्हटकर, झी मीडिया, मुंबई : सीएनजी (CNG) दरात झालेल्या दरवाढीचं कारण देत मुंबईत टॅक्सी भाडे वाढवण्याची मागणी मुंबई टॅक्सीमेन्स युनियनने सरकारकडे केली आहे. पण सरकार दरबारी भाडेवाढी संदर्बात सातत्याने मागणी करुनही ती पूर्ण होत नसल्याने मुंबईतील टॅक्सी चालक संपावर जाणार आहे.
1 ऑगस्टला मुंबईतले टॅक्सीचालक एक दिवसांचा संप पुकारणार आहेत. मुंबईतले तब्बल 48 हजार टॅक्सी चालक संपावर जाणार आहेत. सातत्याने वाढणाऱ्या सीएनजी दरामुळे टॅक्सी भाड्यात दरवाढ करावी अशी मुंबई टॅक्सीमेन्स युनियनची सरकारकडे मागणी आहे.
वाढती महागाई, वाढणारे इंधनाचे दर यामुळे टॅक्सी चालक त्रस्त आहेत. शिवाय गेल्या सात ते आठ महिन्यात सतत सीएनजीचे दर वाढल्याने टॅक्सी चालकांना व्यवसाय करणं अवघड झालं आहे अशी प्रतिक्रिया टॅक्सी चालकांची आहे. त्यामुळे सरकारने तात्काळ याबाबत निर्णय घ्यावा आणि टॅक्सी चालकांना दिलासा द्यावा अशी मागणी टॅक्सी चालक आणि युनियनची आहे.
पहिल्या दीड किलोमीटर साठी टॅक्सीचे भाडे 35 रुपये करण्यात यावी अशी मागणी मुंबई टॅक्सीमेन्स युनियन ची आहे. सध्या पहिल्या दीड किलोमीटर साठी 25 रुपये टॅक्सी भाडे आहे, यात दहा रुपयांनी वाढ मिळावी अशी मागणी टॅक्सीमेन्स युनियनची मागणी आहे. सीएनजी सध्या प्रति किलो 80 रुपये आहे.