Mumbai Streets Dogs: मुंबईतील रस्त्यांवरुन फिरताना भटके कुत्रे हमखास नजरेस पडतात. रात्रीच्या वेळेस घरी जाणाऱ्या मुंबईकरांना याचा विशेष त्रास होतो. भूंकणे, अंगावर धावून येणे, चावणे अशा अनेक भटक्या कुत्र्यांच्या तक्रारी समोर येत असतात. पण आता या भटक्या कुत्र्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे वृत्त समोर आले आहे. 2014 मध्ये केलेल्या भटक्या कुत्र्यांच्या गणनेनुसार मुंबईतील त्यांची लोकसंख्या 95 हजार इतकी होती. आता मुंबई शहरातील भटक्या कुत्र्यांची लोकसंख्या 1 लाख 64 हजारांवर पोहोचली आहे. जी 2014 च्या तुलनेत जवळपास 72 टक्क्यांनी जास्त असल्याचे म्हटले जात आहे.
मुंबई पालिकेकडून भटक्या कुत्र्यांची पुढील गणना जानेवारी 2024 मध्ये केली जाणार आहे. तसेच फेब्रुवारी 2024 मध्ये मोठ्या प्रमाणात रेबीज लसीकरण मोहीम हाती घेतली जाणार असल्याची माहिती पालिकेकडून देण्यात आली आहे. दहा दिवसांत सुमारे एक लाख भटक्या कुत्र्यांचे लसीकरण केले जाईल, असे मुंबई पालिकेने जाहीर केलेल्या पत्रकात म्हटले आहे. पीटीआयने यासंदंर्भातील वृत्त दिले आहे.
नागरी संस्थेने काही स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने मंगळवारी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर 26 भटक्या कुत्र्यांना रेबीज प्रतिबंधक लस दिल्याची माहिती समोर आली आहे.
चांद्रयान-3 च्या यशानंतर आता सूर्य, शुक्राची पाळी; इस्रोची 'अशी' असेल संपूर्ण मोहीम
कुत्र्यांचा जन्मदर मोठा आहे. त्यामुळे कुत्र्यांच्या संख्येवर नियंत्रण ठेवणे हे मुंबई पालिकेसमोरचे मोठे आव्हान आहे. असे असताना पालिकेकडून सातत्याने महत्वाची पाऊले उचलली जात असतात. कुत्र्यांचे निर्बीजीकरण केले जात असले तरी मुंबई शहरातील त्यांची एकूण संख्या पाहता ते काम तितक्या प्रभावीपणे होत नसल्याचेही सातत्याने समोर येते.
भटक्या कुत्र्यांमुळे फुटपाथवरुन चालणाऱ्या, गाड्या चालवणाऱ्या वाहनचालकांना मोठा त्रास होतो. त्यामुळे भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त कसा करता येईल, त्यांची संख्या कशी आटोक्यात ठेवता येईल? हे महत्वाचे मुद्दे वेळोवेळी उपस्थित केले जात असतात.
Bank Holiday list: सप्टेंबर महिन्यात बॅंकाना तब्बल 'इतके' दिवस सुट्ट्या
मुंबईतील 24 वॉर्डात भटक्या कुत्र्यांचे सर्वेक्षण केले जाणार आहे. भटक्या कुत्र्यांना शोधणे, लसीकरण करणे हे खूपच आव्हानात्मक काम असते. अशावेळी पालिकेकडून जीपीएस मॅपिंगद्वारे सर्वेक्षण करण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे. गणना झालेल्या भटक्या कुत्र्यांवर विशिष्ट खूण करण्यात येते. त्यामुळे पुन्हा त्याच कुत्र्याची गणना केली जात नाही.