'लॉकडाऊन' नंतर मुंबईतील सोसायट्यांचा महत्वाचा निर्णय

कोरोनाला टाळण्यासाठी घेतला महत्वाचा निर्णय 

Updated: Mar 26, 2020, 09:03 AM IST
'लॉकडाऊन' नंतर मुंबईतील सोसायट्यांचा महत्वाचा निर्णय  title=

मुंबई : कोरोनाने संपूर्ण जगभरात थैमान मांडल आहे. मुंबईतही कोरोनाबाधित रूग्णांचा आकडा पन्नाशीपार गेला आहे. महाराष्ट्र सरकारपाठोपाठ आता केंद्र सरकारने म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देखील 'लॉकडाऊन' चा निर्णय घेतला आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की,'पुढील २१ दिवस हे भारतासाठी अत्यंत महत्वाचे आहेत. जर आपण आता घरी राहिलो नाही तर संपूर्ण देश हा २१ वर्षे मागे जाईल.' भारत हा प्रगतशील देश आहे. अशावेळी ही अधोगती देशाला परवडणारी नाही. त्यामुळे काळजी घेणं हे अत्यंत महत्वाचं आहे. 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी ३१ मार्चपर्यंत 'लॉकडाऊन' असल्याचं सांगितलं होतं. पण नागरिकांकडून 'लॉकडाऊन'ला मिळणारा प्रतिसाद आणि कोरोनाची लागण झालेल्या रूग्णांची संख्या पाहता. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पुढील २१ दिवस म्हणजे १४ एप्रिलपर्यंत संपूर्ण देश 'लॉकडाऊन' असल्याचं सांगितलं. 

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतलेला हा निर्णय खूप महत्वपूर्ण होता. यानिर्णयामुळे कोरोनाची दाहकता नेमकी किती आहे याची जाणीव काहीशा प्रमाणात नागरिकांना झाली. या धर्तीवर मुंबई आणि मुंबई बाहेरील सोसायट्यांनी काही महत्वाचे निर्णय घेतले आहे. 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोसायट्यांनी घेतला महत्वाचा निर्णय 

  • मुंबई उपनगरातील सोसायटीतील रहिवाशांना गेटबाहेर सोडण्यास सक्त मनाई केली आहे. 
  • तातडीच्या, टाळता न येणार्‍या कामासाठीच लोकांना बाहेर सोडण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. 
  •  उपनगर जिल्हा कोरोना नियंत्रण कक्षाचे सर्व गृहनिर्माण संस्थांना आदेश देण्यात आले आहेत. 
  •  या सर्वावर सोसायटीतील पदाधिकाऱ्यांनी देखरेख ठेवायची, अशी माहिती त्यांच्याकडून देण्यात आली आहे. आणि सोसायटीमध्ये या नियमांचे पालन अगदी काटेकोरपणे होत आहे. 
  •  सोसायटीतील रहिवाशांना लागणारा किराणा आणि भाजीपाला याची यादी करून दुकानातून ते मागवून घ्यायचे आणि गेटवर गर्दी न करता त्याचे वाटप करायचे आहे. तसेच अत्यावश्यक सेवेत येणारे दूध याचे वाटपही घरोघरी न होता आता गेटजवळच करण्यात येत आहे. 
  •  बाहेरून येणाऱ्यांना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंदीच घालण्यात आली आहे. तसंच काहीस तातडीचं काम असेल तर गेट बाहेर त्या व्यक्तीशी संपर्क साधायचा अन्यथा  गेटवर हात स्वच्छ करण्यासाठी सॅनिटायझर ठेवायचे. 
  • तसेच मुलांना सोसायटीच्या आवारात खेळण्यास मज्जाव केला आहे. मुलांना घरीच थांबवण्याची विनंती पालकांना केली आहे. 
  • घरकाम, स्वयंपाक आणि इतर काम करण्यासाठी येणाऱ्या मदतनीस व्यक्तीला देखील सध्या सोसायटीत येण्यास मनाई केली आहे.