मुंबई : दिवाळीच्या निमित्ताने सध्या विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येत आहे. अशाच एका कार्यक्रमाचं आयोजन मुंबईच्या महापौर बंगल्यात करण्यात आलं होतं. पण, हा कार्यक्रम सध्या चर्चेत आहे ते म्हणजे शिवसेनेच्याच काही नेतेमंडळीमुळे.
महापौर बंगल्यात दिवाळी संध्या या कार्यक्रमात महानगरपालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांनी मोठ्या उत्साहात आपली कला सादर केली. पण, त्यामुळे आता राजकीय वर्तुळत बऱ्याच चर्चा रंगण्यास सुरुवात झाली आहे.
जाधव यांनी 'उद्धवा, अजब तुझे सरकार हे गाणं म्हटलं. त्यामुळे उपस्थित शिवसैनिकांना चांगलाच धक्का बसला. 'जगाच्या पाठीवर' या चित्रपटातील ग.दी माडगुळकर यांनी लिहलेलं सुधीर फडके यांनी गायलेलं हे गाणं अजरामर झालं. पण, जाधव यांनी ते चुकीच्या वेळी आणि चुकीच्या कार्यक्रमात म्हटल्यामुळे अनेकांच्याच भुवया उंचावल्या आहेत. सरकार आणि व्यवस्थेप्रती उद्विग्नता व्यक्त करणारं गाणं आणि त्यातही 'उद्धवा, अजब तुझे सरकार' म्हटल्यानं शिवसेना वर्तुळात खळबळ उडाली आहे.
मुख्य म्हणजे त्यांनी गाणं म्हटल्यानंतर बऱ्याच चर्चा रंगत असल्याचं पाहून स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी कोणतंही चुकीच्या पद्धतीचं गाणं म्हटलं नसल्याचं म्हणत महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी हे प्रकरण सावरुन नेण्याचा प्रयत्न केला.
दरम्यान, सध्या जाधव यांच्यावर पक्षांतर्गत विरोधकांचा रोष ओढावला असून, दिवाळी संध्येच्या निमित्ताने सादर करण्यात आलेल्या या सुरेल नजराण्यात त्यांच्याकडून म्हटलं गेलेलं गाणं घोळ करुन गेलं, असंच म्हणावं लागेल.