केंद्र सरकार म्हणतं, मुंबईचं पाणी बाटलीबंद पाण्याहून स्वच्छ

केंद्र सरकारनं देशातल्या २१ शहरांमधील पाण्याची गुणवत्ता तपासली

Updated: Nov 19, 2019, 03:10 PM IST
केंद्र सरकार म्हणतं, मुंबईचं पाणी बाटलीबंद पाण्याहून स्वच्छ title=

बागेश्री कानडे, झी २४ तास मुंबई : मुंबईतल्या पाण्याचा दर्जा देशात सर्वोत्तम असल्याचा अहवाल केंद्र सरकारनं दिलाय. मुंबईच्या पाण्याची गुणवत्ता बाटलीबंद पाण्याएवढी चांगली असल्याचा निष्कर्ष काढण्यात आलाय. देशातली सर्वात मोठी महापालिका मुंबई आहे. याच मुंबईची तहान ठाणे जिल्ह्यातल्या धरणांवर भागते. जवळपास सव्वा कोटी लोकसंख्येसाठी जो पाणीपुरवठा केला जातो तो दर्जेदार असल्याचं केंद्र सरकारनं म्हटलंय. बाटलीबंद पाण्यापेक्षाही चांगलं पाणी मुंबई महापालिका पुरवत असल्याचं केंद्र सरकारच्या एका पाहणी अहवालातून समोर आलंय.

केंद्र सरकारनं देशातल्या २१ शहरांमधील पाण्याची गुणवत्ता तपासली. केंद्रानं ठरवून दिलेल्या एकराच्या अकरा निकषांवर मुंबईचं पाणी पास झालंय.  पाण्याच्या गुणवत्तेत मुंबई महापालिका अव्वल निघालीय. त्यामुळंच काही मुंबईकर नळाचं पाणी फिल्टर न करताच थेट पिण्यासाठी वापरतात. या पाण्यापासून कोणतीही बाधा होत नसल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे.

मुंबई महापालिका नेहमीच पिण्याच्या पाण्याचं नियोजन करत आलीय. वाढत्या लोकसंख्येला पुरेल एवढ्या पाण्याची महापालिका तजवीज करते. पण मुंबईची वाढती लोकसंख्या आणि वाढती पाण्याची गरज पाहता भविष्यात मुंबईसाठी पाण्याचे आहेत हे स्त्रोतही कमी पडणार आहेत. आता जरी केंद्राकडून मुंबईच्या पाण्याचं कौतुक झालं असेल तरीही मुंबई महापालिकेला पाणी प्रश्नावर अजून खूप काम करण्याची गरज आहे.