भाजपाला उद्ध्वस्त करण्याचा शिवसेना नेत्याचा इशारा

 झी २४ तासवरील मुक्त चर्चा कार्यक्रमात ते बोलत होते.

Updated: Jun 28, 2018, 08:35 AM IST

मुंबई : कोकणात भाजपनं नाणार प्रकल्प आणल्यास त्या पक्षाला उद्ध्वस्त करू, असा इशारा पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी दिलाय... झी २४ तासवरील मुक्त चर्चा कार्यक्रमात ते बोलत होते... आम्हाला सहज मंत्रीपदं मिळालेली नाहीत... आम्ही शिवसेनेत ५० पावसाळे खर्ची घातलेत, अशा शब्दांत त्यांनी आपल्या मंत्रिपदाचं समर्थनही केलं. नाणार तेल शुद्धीकरण प्रकल्पाबाबत अबू धाबी आणि केंद्र सरकारमध्ये गुंतवणूक करार झाला आहे. या कराराला थांबवण्याऐवजी गती देण्याचे काम केंद्राकडून जोरात सुरू आहे. केंद्राने जरी नाणारला मंजुरी देण्यासाठी करार करण्याचे प्रयत्न सुरू केले असले तरी कोणताही करार होऊ शकणार नाही. तसंच महाराष्ट्रात हा प्रकल्प होणार नाही म्हणजे नाही, अशी प्रतिक्रिया शिवसेना नेते उध्दव ठाकरे यांनी दिली आहे.

उद्योग मंत्री अंधारात 

हा करार करतांना मुख्यमंत्री आणि उद्योग मंत्र्यांना अंधारात ठेवले. याबाबत निषेध -विरोध हा मंत्रीमंडळ बैठकीत मुख्यमंत्र्यांच्या पुढे नोंदवला आहे. उद्या मुख्यमंत्री-उद्योगमंत्र्या बैठक होणार असून  त्यात याबाबत चर्चा होईल अशी प्रतिक्रीया दिवाकर रावते यांनी दिलीय.

राणेंची नाराजी

माजी मुख्यमंत्री आणि स्वाभिमान पक्षाचे संस्थापक  खासदार नारायण राणे हे आक्रमक झाले आहेत. वेळ पडल्यास राजीनामा फेकून देईन आणि नाणारला एकही दगड रचू देणार नाही, अशा इशारा राणे यांनी दिला आहे.