पावसाची रिपरिप सुरुच; गणेश भक्तांचा हिरमोड

जाणून घ्या काय आहे सध्याची परिस्थिती आणि रेल्वे वाहतुकीचा आढावा   

Updated: Sep 8, 2019, 07:17 AM IST
पावसाची रिपरिप सुरुच; गणेश भक्तांचा हिरमोड  title=
संग्रहित छायाचित्र

मुंबई : साधारण गेल्या आठवडाभरापासून सुरु असणाऱ्या पावसाची रिपरिप काही केल्या थांबण्याचं नाव घेत नाही आहे. शनिवारी रात्रभर मुंबई आणि पश्चिम उपनगरांमध्ये पावसाची बॅटींग पाहायला मिळाली. मध्येच उसंत घेत पावसाचा जोर पुन्हापुन्हा वाढत होता. परिणामी मुंबईतील अनेक सखल भागांमध्ये पाणी साचल्याचं पाहायला मिळालं. पहाटेनंतर मात्र पावसाने काहीशी विश्रांती घेतली आहे. असं असलं तरीही आकाश मात्र निरभ्र नाही. त्यामुळे वरुणराजा रविवारच्या दिवशीही बरसण्याची स्पष्ट चिन्हं आहेत. 

रात्रभर पावसाची रिपरिप सुरु असल्यामुळे हिंदमाता, किंग्ज सर्कल या भागांमध्ये पाणी साचलं होतं. परिणामी लालबागच्या दिशेने येणाऱ्या वाहतुकीवर याचा काही प्रमाणात परिणामही झाला होता. मुख्य म्हणजे गेल्या काही दिवसांपासून पडणाऱ्या पावसामुळे गणेश भक्तांचा मोठ्या प्रमाणात हिरमोड झाला. ज्यामुळे आता या वरुणराजाला आतातरी विश्रांती घे, असंच साकडं भक्तगण आणि सबंध मुंबईकर करत आहेत. 

काय आहे रेल्वे वाहतुकीची परिस्थिती? 

मुंबई आणि पश्चिम उपनगपरांमध्ये रात्रभर पाऊस सुरु असला तरीही त्याचे रेल्वे वाहतुकीवर मात्र फारसे परिणाम झालेले नाहीत. मध्य रेल्वे दहा ते पंधरा मिनिटं उशिराने सुरु आहे. पण, मोठ्या प्रमाणावर प्रवाशांचा खोळंबा होत नसल्याची बाबही तितकीच महत्त्वाची आहे. फक्त मध्यच नव्हे, तर पश्चिम आणि हार्बर मार्गांवरील रेल्वे वाहतुकही सुरळीत सुरु आहे.