'गेट वे ऑफ इंडिया'वरून पोलिसांनी आंदोलकांना हटवलं

मुंबईत दिल्लीच्या जेएनयू हिंसाचाराविरुद्ध आंदोलन

Updated: Jan 7, 2020, 09:05 AM IST
'गेट वे ऑफ इंडिया'वरून पोलिसांनी आंदोलकांना हटवलं title=

मुंबई : जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटी अर्थात जेएनयूमध्ये ५ जानेवारी रोजी झालेल्या हिंसाचाराचा निषेध करण्यासाठी मुंबईतल्या गेट-ऑफ इंडियाजवळ ठिय्या आंदोलन करणाऱ्या आंदोलकांना पोलिसांनी हटवलंय. आंदोलकांना आझाद मैदानात आंदोलन करण्याचं आवाहन पोलिसांनी केलंय. गेट वे ऑफ इंडियाजवळील आंदोलनामुळे रस्ते वाहतुकीवर परिणाम होतोय. तसंच पर्यटकांनाही अडचणीचा सामना करावा लागत असल्यामुळे आंदोलकांना आझाद मैदानात जाण्याच्या सूचना पोलिसांनी दिल्या. मात्र, आंदोलकांनी नकार दिल्यामुळे त्यांना ताब्यात घेण्यात आलं. तसंच त्यांना पोलीस व्हॅनमधून आझाद मैदानात नेण्यात आलं.

\

मुंबईत 'फ्री काश्मीर'चं पोस्टर?

मुंबईत करण्यात आलेल्या या आंदोलनात 'फ्री काश्मीर'चे पोस्टर दिसल्याचंही सांगण्यात येतंय. या आंदोलनादरम्यानचा एक व्हिडिओही समोर आलाय. या व्हिडिओत एक महिलेच्या हातातहातात 'फ्री काश्मीर'चं पोस्टर दिसून येत आहे. ५ ऑगस्ट रोजी भारत सरकारनं जम्मू-काश्मीरचा विशेष राज्याचा दर्जा देणारा अनुच्छेद ३७० रद्द केला होता. त्यासोबतच जम्मू-काश्मीर आणि लडाख अशा दोन केंद्रशासिक प्रदेशांमध्ये या भागाचं विभाजन करण्यात आलं होतं.

जेएनयू हिंसाचार

दुसरीकडे जेएनयूमध्ये ५ जानेवारी रोजी रात्री उशिरा घडवून आणलेल्या हिंसाचारात २० हून अधिक विद्यार्थी जखमी झाले होते. रविवारी काही कपड्यानं चेहरा झाकलल्या लोकांनी जेएनयूमध्ये घुसून विद्यार्थ्यांना मारहाण आणि तोडफोड केली होती. त्यांच्या हातात काठ्या आणि लोखंडाच्या सळ्याही होत्या. साबरमती विद्यार्थी हॉस्टेल या हल्ल्याच्या टार्गेटवर होतं. जेएनयू विद्यार्थी संघटनेनं अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (ABVP) वर हा हल्ला घडवून आणण्याचा आरोप केलाय. तर एबीव्हीपीनं डाव्या विचारसरणीच्या गटावर मारहाणीचा आरोप केलाय.