मुंबईतच राहून 15 वर्ष गंडवलं, पण एका टॅटूने अडकलं; मुंबई पोलिसांची भन्नाट कारवाई

Crime News: मुंबईमधील (Mumbai) एक गुन्हेगार गेल्या 15 वर्षांपासून फरार होता. गेल्या 15 वर्षांपासून तो पोलिसांना चकवा देत होता. पण अखेर एका टॅटूमुळे तो पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे. सुरुवातीला तो आपणच तो आरोपी असल्याचं मान्य करत नव्हता. पण एका टॅटूमुळे त्याचं बिंग फुटलं.   

Updated: Mar 25, 2023, 03:52 PM IST
मुंबईतच राहून 15 वर्ष गंडवलं, पण एका टॅटूने अडकलं; मुंबई पोलिसांची भन्नाट कारवाई title=

Crime News: गुन्हा केल्यानंतर फरार झालेल्या आरोपींचा शोध घेणं अनेकदा पोलिसांसाठी फार आव्हानात्मक असतं. आरोपीचा काहीच सुगावा सापडला नाही तर अनेकदा त्या फाईल बंद करुन ठेवल्या जातात. पण मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) तब्बल 15 वर्षानंतर एका आरोपीला अटक केली आहे. 63 वर्षीय आरोपी गेल्या 15 वर्षांपासून फरार होता. पोलिसांना त्याची ओळख पटवणं कठीण जात होतं. पण एका पुराव्याच्या आधारे पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. आरोपीला सध्या जेलमध्ये बंद करण्यात आलं आहे. 

पोलिसांनी अटक केल्यानंतर आरोपी आधी नकार देत होता. पण एका टॅटूमुळे त्याचं बिंग फुटलं आणि त्याने आपला गुन्हा कबूल केला.

नेमकं काय झालं होतं?

आरएके पोलिसांनी 2008 मध्ये तेल चोरीच्या आरोपात अर्मुगम देवेंद्र आणि त्याच्या साथीदाराला अटक केली होती. बॉम्बे पोर्ट ट्रस्टमध्ये घुसखोरी करुन हे तेल चोरण्यात आलं होतं. पोलिसांनी अटकेची कारवाई केल्यानंतर देवेंद्रला जामीन मिळाला होता. यानंतर पोलिसांनी त्याची सुटका केली होती.

दरम्यान चार्जशीट दाखल झाल्यानंतर त्याचा जामीन रद्द झाला होता. पण यानंतरही जेव्हा तो कोर्टात हजर झाला नाही तेव्हा त्याला फरार घोषित करण्यात आला. पोलीस त्याचा शोध घेत घरापर्यंत पोहोचले होते. पण घरामध्ये फक्त पत्नीच होती. पोलिसांनी तो कधीही घरात सापडला नाही. यादरम्यान त्याच्या पत्नीचंही निधन झालं. 

आरोपीला पकडण्यासाठी पोलिसांनी अटक करताना हातावरील टॅटूचा काढलेला फोटो एक महत्त्वाचा दुवा होता. पोलिसांनी त्याचा बराच शोध घेतला. पण 15 वर्षं त्यांच्या हाती काही लागलं नाही. पोलिसांनी खबऱ्यांकडून त्याच्याबद्दल कधीकधी माहिती मिळत होती. एका खबऱ्याने तर, त्याचा मृत्यू झाला असं पोलिसांना सांगितलं होतं. तर काहींनी तो राज्याबाहेर गेला असून तिथेच स्थायिक झाला असल्याचं सांगितलं.

तपासादरम्यान पोलिसांनी देवेंद्रच्या मुलाबद्दल माहिती मिळाली. त्यांनी त्याच्या मोबाइल क्रमांकाच्या सहाय्याने कॉल डिटेल मिळवली असता एका क्रमांकावर जास्त बोलणं झालं असल्याचं लक्षात आलं. या नंबरचं लोकेशन काढलं असता मुंबईतील अनेक पर्यटन स्थळांवर असल्याचं समोर आलं. जुहू चौपाटी, मरिन ड्राइव्ह, गेट वे ऑफ इंडिया अशी ठिकाणी हा नंबर सुरु असल्याचं दिसत होतं. 

पोलिसांना देवेंद्र एखाद्या टुरिस्ट बसमध्ये असावा अशी शंका आली. पोलिसांनी देवेंद्रच्या व्हॉट्सअपचा स्टेटस पाहिला असता त्यावर एका ट्रान्सपोर्ट सर्व्हिस बसचा फोटो होता. त्यावर 'मुंबई दर्शन'चा लोगो होता.

पोलिसांनी एका व्यक्तीला ग्राहक बनवून टुरिस्ट कंपनीच्या कार्यालयात पाठवलं. मुंबई दर्शनसाठी बस पाहिजे असल्याचं त्याने सांगितलं. याचवेळी ऑफिसमध्ये असणाऱ्या देवेंद्रला बेड्या ठोकल्या. त्याने आपलं नाव अर्मुगम देवेंद्र असल्याचं सांगितलं. पण जेव्हा पोलिसांनी टॅटू पाहिला तेव्हा त्याने आपणच आरोपी असल्याचं कबूल केलं.