मुंबई : सोशल मीडियावर व्हायरस होणारे अनेक व्हिडीओ नेटकऱ्यांसोबतच या वर्तुळात नसणाऱ्यांसाठीही कुतूहलाचा विषय ठरतात. निमित्त ठरतात ती विविध माध्यमं. सध्या अशाच विविध माध्यमातून जनसामान्यांपर्यंत पोहोचलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्यांची चर्चा सर्वत्र सुरु आहे.
आपल्या अफलातून नृत्यकौशल्यानं ते सर्वांचीच मनं जिंकत आहेत. आया है राजा, लोगो रे लोगो या गाण्याचा ठेका पकडून तरुणाईला आणि प्रशिक्षित डान्सर्सनाही लाजवेल असा डान्स हे पोलीस करत आहेत.
मुंबई पोलीस दलातील या स्टार डान्सरचं नाव आहे, अमोल कांबळे. भल्याल्या डान्स करणाऱ्यांचा आणि कलाकारांचा डान्सही अमोल कांबळे यांच्या डान्सपुढे फिका ठरत आहे. त्यांचा एकंदर अंदाज, चेहऱ्यावरील हावभाव आणि गाण्यातील ठेक्यावर थिरकणारे त्यांचे पाय पाहिले की नकळतच व्हिडीओ पाहणाऱ्यांच्याही चेहऱ्यावर स्मित येत आहे.
आपल्या या कलेबाबत 'झी24तास'शी संवदा साधताना कांबळे म्हणतात, 'ड्युटी सुटायची तेव्हा किंवा सुट्टीच्या दिवशी मी व्हिडीओ पोस्ट करत होतो. पण, नंतर ते बंद झालं. नंतर मला एका मित्राने इन्स्टाग्रामवर व्हिडीओ पोस्ट करायला सांगितलं. तेव्हा इन्स्टाग्रामवर जुनेच व्हिडीओ टाकण्यास सुरुवात केली. पुढे अशी वजनदार शरीरयष्टी असणारा माणूसही कशा प्रकारे अनोख्या अंदाजात या कलेचा आनंद घेतो याबाबचं नेटकऱ्यांचं कुतूहल वाढलं आणि व्हिडीओ गाजत गेले'.