प्रतीक्षा बनसोडे, मुंबई - लेकीसाठी तिचे वडील किती महत्त्वाचे असतात किंवा एखाद्या वडिलांसाठी त्यांची लेक किती महत्त्वाची असते याचा दाखला देण्याची गरज नाही. कारण, या नात्याचा उल्लेख झाला, की त्यासोबतच सर्व गोष्टी आल्या म्हणून समजा. अनेक बापमाणसांसाठी त्यांची लेक सर्वतोपरी महत्त्वाची असते. पण, काहींसाठी त्यांचं काम आणि त्याप्रती असणारी कर्तव्यनिष्ठासुद्धा तितकीच महत्त्वाची असते.
मुंबईचे पोलीस आयुक्त Vivek Phansalkar हे अशाच कर्तव्यनिष्ठ बाबांपैकी एक. लेकीचं लग्न असतानाही त्यांनी कामाला आणि आपल्या जबाबदारीला प्राधान्य दिलं. त्यामुळं खऱ्या अर्थानं या लेकीसाठी फणसळकर पुन्हा एकदा तिचे पहिलेवहिले सुपरहिरो ठरले असं म्हणायला हरकत नाही.
कर्तव्यदक्ष पोलीस अधिकाऱ्यांची अशी ही कहाणी.. मुलीचं लग्न असताना बाबा मात्र ऑन ड्युटी.. पोलीस आयुक्त विवेक फणसळकर तुमच्या कर्तव्यनिष्ठेला सलाम #Mumbaipolice #MumbaiCP #IPSOfficer #vivekphansalkar pic.twitter.com/yRbwGARPsI
— Pratiksha Bansode (@pratikshapb) December 17, 2022
आज मुंबईत महाविकास आघाडीकडून भाजपविरोधात महामोर्चा काढण्यात आला होता, तर दुसरीकडे महाविकास आघाडीविरोधात भाजपने आज माफी मांगो आंदोलन करण्याची घोषणा केली होती. राज्याची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत आज राजकीय पक्षाच्या मोर्चा आणि आंदोलनामुळे राजकीय हायव्होलटेज ड्रामा असे चित्र पाहायला मिळाले. या मोर्चा आणि आंदोलनात कायदा सुव्यवस्था राखण्याची मोठी जबाबदारी पोलिसांकडे होती. मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी कायदा सुव्यवस्थेचे पालन करत मोर्चा आणि आंदोलन कोणतेही गालबोट न लागू देता नीट हातळले.
पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी या आधीही असे अनेक राजकीय मोर्चे आणि आंदोलन नीट हातळली आहेत पण आज त्यांनी कर्तव्यदक्ष पोलिस अधिकारी या प्रतिमेचे उत्तम उदाहरण सुद्धा समाजासमोर दिले आहे. पोलीस आयुक्त फणसळकर यांच्या मुलीचा आज विवाह आहे. तिच्या लग्नाची पत्रिका सुद्धा समोर आली आहे. घरात मंगलविधी असताना सुद्धा पोलीस आयुक्त फणसळकर सकाळपासूनच आपल्याला ऑन फिल्ड काम करताना दिसतायत. कर्तव्यदक्ष या पोलीस अधिकाऱ्यांनी घरातील मंगलविधी बाजूला करत आधी आपल्या जबाबदारीला प्राधान्य दिल्याचे पाहायला मिळते.
कोण आहेत पोलीस आयुक्त विवेक फणसळकर
मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर हे 1989 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. मुंबई पोलिस आयुक्त होण्याआधी ठाणे शहराचे पोलीस आयुक्त म्हणून काम पाहत होते. फणसळकर यांनी त्यांच्या प्रदीर्घ पोलीस कारकिर्दीत महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाचे अतिरिक्त महासंचालक आणि महाराष्ट्र लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे एडीजी या पदांवर काम केले आहे.