Mumbai News : प्रेम... जिव्हाळा या अशा गोष्टी आहेत ज्या वय, पैसा किंवा समोरच्याचं स्वरुप पाहून होत नाहीत. प्रेम व्यक्तीवरही असू शकतं आणि एखाद्या प्राण्यावरही. अनेकदा तर, बरीच मंडळी प्राण्यांना इतका जीव लावतात की, ते त्यांच्या जीवनातील, त्यांच्या कुटुंबातील एक अविभाज्य भागच होऊन जातात.
घरात असणारा श्वान असो, मांजर असो किंवा मग आणखी कोणते प्राणी असो. कैक कुटुंबांमध्ये या प्राण्यांसाठी वेगळं खाणं, त्यांच्या वास्तव्याची वेगळी जागा असं एक अनोखं विश्व तयार केलेलं असतं. या प्राण्यांचा वाढदिवसही साजरा होतो बरं! पण, तुम्ही कधी या प्राण्यांना लाखोंचं गिफ्ट मिळाल्याचं पाहिलं आहे का?
प्राणीमात्रांना लाखोंचं गिफ्ट.... काहीसं पचणार नाही पण हे खरंय. ज्या मंडळींना यावर विश्वास बस नाहीय, त्यांच्यासाठी एक व्हारयल होणारा व्हिडीओही पुरेसा आहे. या व्हिडीओ आहे मुंबईतील एका महिलेचा. जिनं तिच्या पाळीव श्वानाला भेट म्हणून चक्क साडेतीन तोळे म्हणजेच 35 ग्रॅम वजनाची आणि साधारण अडीच लाख रुपये किमतीची सोनसाखळी बनवून घेतली आहे.
सराफांच्या दुकानाच्याच सोशल मीडिया पेजवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला जिथं ही महिला सोनसाखळी श्वानाच्या गळ्यात घालताना दिसत आहे. टायगर, असं तिच्या श्वानाचं नाव. आश्चर्याची बाब म्हणजे आपल्या मालकिणबाईंनी आवडीनं आणि मोठ्या प्रेमानं दिलेली ही सोनसाखळी पाहून हा श्वानही शेपूट हलवून जणू आनंद व्यक्त करत असल्याचं या व्हायरल व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे. व्हायरल झालेल्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी कमेंट्सच्या माध्यमातून विविध भावना केल्याचं पाहायला मिळालं.
कोणी प्राणीमात्रांप्रती महिलेच्या मनात असणाऱ्या प्रेमाचं कौतुक केलं, तर कोणी या महिलेनं केलेल्या खरेदीवर भुवया उंचावल्याची प्रतिक्रिया दिली. भेट घेतली तर, व्हिडीओची गरज काय? असा काहीसा बोचरा प्रश्नसुद्धा काही नेटकऱ्यांनी विचारला. हा व्हिडीओ आणि श्वानाप्रची महिलेची कृती पाहून तुम्हाला काय वाटतं?