Mumbai News : मुंबईकरांचा प्रवास महागणार; घराबाहेर पडण्याआधी सोबत ठेवा जास्तीचे पैसे

Mumbai News : सीएनजीच्या दरात प्रतिकिलोमागे वाढ झाली असून, याशिवाय पाईपलाईननं घराघरात येणाऱ्या स्वयंपाकाच्या गॅसमध्येही दरवाढ करण्यात आली.   

सायली पाटील | Updated: Jul 11, 2024, 07:51 AM IST
Mumbai News : मुंबईकरांचा प्रवास महागणार; घराबाहेर पडण्याआधी सोबत ठेवा जास्तीचे पैसे  title=
Mumbai News cng price hike will result in taxi fare know the latest updates

Mumbai News : लोकसभा निवडणुकांचे निकाल जाहीर होण्यापूर्वी विविध गोष्टींच्या दरात कपात झाल्याचं वृत्त येत होतं आणि निकाल जाहीर झाल्यानंतर ही स्थिती बदलल्याचं पाहायला मिळालं. थोडक्यात आता समोर येऊ लागली दरवाढीची वृत्त. काही दिवसांपूर्वीच केंद्र सरकारनं सीएनजीच्या दरांमध्ये प्रतिकिलोमागे 1.5 रुपयांची वाढ करण्याचा निर्णय जाहीर केला. घरगुती पाईपलाईन गॅसची दरवाढही यावेळी जाहीर करण्यात आली. ज्यानंतर आता मुंबई शहरातील प्रवास महागण्याची चिन्हं स्पष्टच दिसू लागली आहेत. 

सीएनजीच्या दरात 1.5 रुपयांची वाढ झाल्यानंतर रिक्षा संघटनेनंही भाडेवाढ करण्याची मागणी उचलून धरली आहे. ज्यामागोमाग आता टॅक्सी युनियनही दरवाढीसंदर्भात महत्त्वाचा निर्णय येत्या काळात घेणार असल्याचं स्पष्ट होत आहे. दरम्यान केंद्रानं सीएनजी आणि पीएनजीमध्ये केलेल्या दरवाढीनंतर ऑटोरिक्षा चालकांनी प्राथमिक दर 23 रुपयांवरून 25 रुपयांवर करण्याची मागणी केली आहे. तर, प्रति किमी रनिंग भाडं 15.33 रुपयांवरून 16.99 रुपये केलं जाण्याची मागणीसुद्धा केली आहे.

हेसुद्धा वाचा : Maharashtra Weather News : सोसाट्याचा वारा अन् जोरदार पाऊसधारा; राज्याच्या 'या' भागात पाऊस पुन्हा देणार दणका

 

चालक संघटनेच्या नेत्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार सीएनजीमध्ये करण्यात आलेल्या दरवाढीमुळे ऑटोचालकांना दर दिवशी 150 रुपयांचं नुकसान सोसावं लागत असल्याची बाब त्यांनी पुढे केली. इथं ऑटो चालकांनी ही मागणी केलेली असतानाच टॅक्सी चालक संघटनेकडूनही प्राथमिक भाडं 28 रुपयांवरून 30 रुपये करण्याची मागणी उचलून धरण्यात आली आहे. दरम्यान यासंदर्भातील निर्णय सविस्तर चर्चांनंतरच होणार आहे. ऑटोरिक्षा आणि टॅक्सी युनियननं निर्णय घेतल्यानंतर सदरील निर्णयासंदर्भातील प्रस्ताव परिवहन विभागाकडे पाठवण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. 

दोन वर्षांपूर्वी झालेली भाडेवाढ 

MMRTA च्या वतीनं 2022 मध्ये रिक्षा आणि टॅक्सीची भाडेवाढ करण्यात आली होती. इथं ऑटोरिक्षासाठी 2 रुपये आणि टॅक्सीभाड्यामध्ये 3 रुपये इतकी वाढ करण्यात आली होती. आता दोन वर्षांनंतर ही वाढ नेमकी किती फरकानं होते हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.