Tomato Prices : मागील काही दिवसांपासून कमालीचा महाग झालेला लालबुंद टोमॅटो आता पुन्हा एकदा आपल्या जेवणाचा भाग होणार आहे. कारण, टोमॅटोच्या दरांत घट झाल्याची माहिती समोर आली आहे. सध्याच्या घडीला मुंबईत टोमॅटो 60 ते 80 रुपये प्रतिकिलोनं विकले जात आहेत. फक्त टोमॅटोच नव्हे, तर इतर भाज्यांचे दरही कमी झाल्यामुळं सर्वसामान्यांना आणि त्याहूनही स्वयंपाकघरांचा ताबा असणाऱ्या मंडळींना दिलासा मिळाला आहे. जुलै महिन्यात 100 रुपयांच्या घरात असणाऱ्या भाज्या आता मात्र 80 रुपये किलो इतक्या दरानं विकले जात आहेत. महाराष्ट्र आणि दक्षिण भारतातून भाजीपाल्याचा नवा पुरवठा पुन्हा एकदा सुरु झाल्यामुळं येत्या काळात Retail Market मध्ये भाज्यांचे दर 25 ते 30 रुपयांपर्यंतही उतरण्याची चिन्हं आहेत.
सध्या कोथिंबीरीजी एक जुडी 10 रुपयांना विकली जात असून, हे दर 40 रुपयांनी कमी झाले आहेत. तर मिरची तब्बल 100 रुपयांनी उतरली असून, आता तिच्यासाठी 200 रुपये मोजावे लागत नाहीयेत. फ्लॉवर, वांगं, भेंडी आणि फरसबीच्याही किमती कमी झाल्या आहेत. गवार आणि टिंडे या भाज्यांचे दर मात्र फारसे कमी झालेले नाहीत.
शुक्रवारी वाशी एपीएमसीमध्ये चांगल्या प्रतीचे टोमॅचो 35 रुपये आणि त्याखालोखाल येणारे टोमॅटो 25 ते 30 रुपये प्रतिकिलोनं विकले गेले. 160 रुपये किलोनं खरेदी केले जाणारे टोमॅटो इतक्या कमी दरात मिळत असल्यामुळं आता अनेकांनीच त्यांच्या खरेदीसाठी झुंबड केली आहे.
अधिकृत माहितीनुसार टोमॅटोचे दर नाशिकमध्ये गेल्या काही दिवसांत सहा वेळा वाढले. तर, सर्वाधिक टोमॅटोचा पुरवठा बंगळुरूमधून केला गेला. याशिवाय पावसाळी दिवसांमध्ये नमारायणगावापासून अगदी हिमालयाच्या पायथ्य़ाशी असणाऱ्या गावांमधूनही टोमॅटोचं उत्पानदनं पुरवलं जातं. ऑगस्ट ते डिसेंबरदरम्यान नाशिकमधून सर्वाधिक टोमॅटोचा पुरवठा केला जातो. येत्या काळात टोमॅटोचा पुरवठा पाहता दर स्थिर राहण्याचं चित्र पाहायला मिळत आहे. कांदा आणि लसूण मात्र काही अंशी महागणार असल्याची शक्यता आहे. त्यामुळं सर्वसामन्यांची एक चिंता मिटत नाही तोच दुसरी चिंता डोकं वरून काढून उभीच असते असं म्हणायला हरकत नाही.