मुंबई : मुंबईतल्या वाहतूक कोंडीचा फायदा घेऊन कारचालकांची लूट करणारी टकटक गँग अखेर गजाआड झाली आहे. मुंबई पोलिसांनी टकटक गँगमधील दोन आरोपींना अटक केली आहे.
वाहतूक कोंडीत अडकलेल्या कार हेरून चोरटे काचेवर टक-टक करून कारचालकाचं लक्ष वेधून घ्यायचे, त्यानं काच खाली करताच आरोपी गाडीतील मोबाईल, पर्स अशा वस्तू घेऊन पोबारा करायचे. टकटक गँगचा सीसीटीव्ही व्हिडीओदेखील समोर आलाय.
याप्रकरणी मुंबई पोलिसांनी वसिम बाबू कुरेशी उर्फ वसिम हापुडीया,निलेश अशोक रांजणे या दोन आरोपीना अटक करण्यात केलीय. त्यांच्याकडून मोबाईल फोन, एटीएम कार्ड्स आणि युनिव्हर्सल पास जप्त करण्यात आलेत. टकटक गँगच्या अटकेनं 10 पेक्षा जास्त गुन्ह्यांची उकल झाली आहे.
अटक करण्यात आलेले सराईत आरोपी असून मुंबईच्या विविध पोलीस ठाण्यात त्यांच्यावर गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. पोलिस त्यांच्या इतर साथीदारांचा शोध घेत आहेत. मुंबईत ही गँग चांगलीच सक्रिय आहे. सिग्नलवर उभ्या असलेल्या कारवर ही गँग निशाणा साधते, कारचालकाचं लक्ष विचलित करत चोरी करुन तिथून पळ काढतात, त्यामुळे कारचालकांना जागरुक राहण्याची गरज आहे.