Mumbai Local : ऐन मेगाब्लॉमध्येच (Mega Block) अंबरनाथ- बदलापूर रेल्वे स्थानका दरम्यान लोकलचा एक डबा रुळावरून घसरल्याची माहिती समोर आली आहे. सायडिंगला असलेली लोकल (Local Train) मेन लाईनला येत असताना हा सर्व प्रकार घडल्याचे म्हटलं जात आहे. त्यामुळे मुंबईकडे (Mumbai News) जाणाऱ्या वाहतुकीवर परिणाम झाला आहे. सुदैवाने या अपघातात कुणालाही दुखापत झालेली नाही. मात्र या अपघातामुळे कल्याण ते कर्जत दरम्यानची वाहतूक विस्कळीत झाली आहे
रेल्वेच्या तिन्ही मार्गावर आज मेगाब्लॉक
विविध अभियांत्रिकी कामासाठी रविवारी मध्य रेल्वेच्या तिन्ही मार्गावर आज मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य, हार्बर आणि पश्चिम रेल्वेवरील रेल्वे रूळ, सिग्नल यंत्रणा आणि ओव्हरहेड वायरच्या दुरुस्तीसाठी हा मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेवरील ठाणे-कल्याण अप आणि डाऊन जलद मार्गावर, हार्बर मार्गावर पनवेल-वाशी अप आणि डाऊन मार्गावर, पश्चिम रेल्वे अंधेरी ते गोरेगाव अप आणि डाऊन धिम्या मार्गावर मेगा ब्लॉक असणार आहे.
मध्य रेल्वेमार्गावर सकाळी 10.40 ते दुपारी 3.40 पर्यंत मेगा ब्लॉक असणार आहे. त्यामुळे सीएसएमटी सकाळी 9.30 ते दुपारी 2.45 वाजेपर्यंत सुटणाऱ्या डाऊन जलद लोकल ठाणे आणि कल्याण स्थानकांदरम्यान डाऊन धिम्या मार्गावर वळवण्यात येणार आहेत. या लोकल कळवा, मुंब्रा आणि दिवा स्थानकांवर थांबतील. कल्याण येथून सकाळी 10.28 ते दुपारी 3.25 पर्यंत सुटणाऱ्या अप जलद लोकल कल्याण आणि ठाणे स्थानकांदरम्यान अप धिम्या मार्गावर वळवण्यात येणार आहेत.
तर पनवेल-वाशी अप आणि डाऊन मार्गावर सकाळी 11.05 ते दुपारी 04.05 पर्यंत मेगाब्लॉक असणार आहे. पनवेल येथून सीएसएमटीकडे जाणाऱ्या अप हार्बर मार्गावरील लोकल आणि सीएसएमटी येथून पनवेल/ बेलापूरकडे जाणाऱ्या डाऊन हार्बर मार्गावरील लोकल रद्द करण्यात आल्या आहे. दरम्यान, पश्चिम रेल्वे मार्गावर अंधेरी ते गोरेगावदरम्यान अप आणि डाऊन धिम्या मार्गावर सकाळी 10.35 ते दुपारी 3.35 वाजेपर्यंत मेगा ब्लॉक असणार आहे. या ब्लॉक कालावधीत अंधेरी आणि गोरेगाव अप आणि डाऊन धिम्या मार्गावरील सर्व लोकल जलद मार्गावर वळवण्यात येतील