Mumbai Crime : देशातल्या सर्वात व्यस्त अशा मुंबई विमानतळावरुन एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. विमानतळावर एका वृद्ध व्यक्तीचा व्हीलचेअर न मिळाल्याने मृत्यू झाला. मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर ज्येष्ठ नागरिकाला विमान कंपनीने व्हीलचेअर उपलब्ध न करून दिल्यामुळे त्याला जीव गमवावा लागला. व्हीलचेअर न मिळाल्याने त्या व्यक्तीला पायीच जावे लागले आणि इमिग्रेशन काउंटरवर पोहोचत असताना वृद्धाचा खाली पडली. त्यानंतर रुग्णालयात त्या वृद्ध व्यक्तीचा मृत्यू झाला.
एअर इंडियाच्या विमानाने न्यूयॉर्कहून मुंबईला आलेल्या 80 वर्षीय व्यक्तीला विमान कंपनीकडून व्हीलचेअर न मिळाल्याने त्याला चालत जावे लागले आणि त्याचा मृत्यू झाला. एअर इंडियाच्या या वृद्ध प्रवाशाने मुंबई विमानतळावर उतरल्यानंतर कंपनीकडे व्हीलचेअर देण्याची विनंती केली होती. मात्र व्हीलचेअरची प्रचंड मागणी असल्याने त्यांना थांबण्यास सांगण्यात आले. यानंतर वृद्ध व्यक्ती पत्नीसह टर्मिनलमधून बाहेर पडले. इमिग्रेशन काऊंटरपर्यंत पोहोचताच ती वृद्ध व्यक्ती खाली पडली.
12 फेब्रुवारी रोजी न्यूयॉर्कहून एअर इंडियाच्या विमानातून प्रवासी उतरल्यानंतर विमानतळावर ही घटना घडली. विमान कंपनीच्या प्रवक्त्याने शुक्रवारी सांगितले की, तो प्रवासी 80 वर्षांपेक्षा जास्त वयाचा होता. या वृद्ध दाम्पत्याला एकच व्हीलचेअर देण्यात आली होती. त्यामुळे वृद्ध पतीला विमानातून पायी चालत इमिग्रेशन काउंटरवर जावे लागले. काउंटरवर जाताच खाली पडली. त्यानंतर वृद्ध व्यक्तीला रुग्णालयात नेते असता त्याचा मृत्यू झाला.
या जोडप्याने स्वत:साठी विमान कंपनीकडे व्हीलचेअर बुक केली होती. एअर इंडियाचे विमान मुंबई विमानतळावर उतरले तेव्हा या जोडप्याला फक्त व्हीलचेअर सापडली. त्यामुळे पतीने वृद्ध पत्नीला त्यावर बसवले आणि तो तिच्या मागे चालू लागला. विमानापासून दीड किलोमीटर अंतरावर असलेल्या टर्मिनलमध्ये असलेल्या इमिग्रेशन काउंटरपर्यंत त्या वृद्ध व्यक्तीला पायी चालत जावे लागले. काउंटरवर पोहोचताच वृद्ध व्यक्तीला चक्कर आली आणि तो खाली पडला. या घटनेनंतर त्या व्यक्तीला नानावटी रुग्णालयात नेण्यात आले. त्यानंतर रुग्णालयात वृद्ध व्यक्तीचा मृत्यू झाला.
एअर इंडियाने दिलं स्पष्टीकरण
या वृद्ध जोडप्याने न्यूयॉर्कहून मुंबईला इकॉनॉमी क्लासमध्ये एअर इंडियाच्या एआय-116 या विमानाने प्रवास केला होता. हे विमान सोमवारी सकाळी 11.30 वाजता उतरणार होते. मात्र ते दुपारी 2.10 वाजता उतरले. वृद्ध व्यक्तीच्या मृत्यूबाबत एअर इंडियाच्या प्रवक्त्याने स्पष्टीकरण दिलं आहे. "व्हीलचेअरची प्रचंड मागणी असल्याने आम्ही प्रवाशाला व्हीलचेअरची मदत मिळेपर्यंत थांबण्याची विनंती केली होती. पण वृद्ध प्रवाशाने सोबत पायी चालणे पसंत केले. ही दुर्दैवी घटना असून आम्ही शोकग्रस्त कुटुंबीयांच्या सतत संपर्कात आहे आणि आवश्यक ती मदत करत आहोत," असे एअर इंडियाने म्हटलं.