Mumbai News : लालबागमध्ये गणेशोत्सवाच्या खरेदीसाठी आलेल्यांना बेस्ट बसची धडक; 28 वर्षीय तरुणीचा मृत्यू

Mumbai News : गणेशोत्सवाआधी लालबाग परळ परिसरातील बाजारपेठा खुलल्या असून, आतापासून इथं गणेशभक्तांची गर्दी आणि लगबग आहे. पण, त्यातच एक अप्रिय घटना घडल्यामुळं उत्सवाआधीच या उत्साहाला गालबोट लागल्याचं पाहायला मिळत आहे.   

सायली पाटील | Updated: Sep 2, 2024, 09:43 AM IST
Mumbai News : लालबागमध्ये गणेशोत्सवाच्या खरेदीसाठी आलेल्यांना बेस्ट बसची धडक; 28 वर्षीय तरुणीचा मृत्यू  title=
Mumbai news BEST bus accident lalbaug Nine pedestrians hurt

Mumbai News : सुट्टीचा दिवस असल्यामुळं मुंबई शहरातील अनेक बाजारपेठांमध्ये गर्दी पाहायला मिळाली. त्यातच सर्वाधिक गर्दी होती ती म्हणजे लालबागमधील परिसरामध्ये. या भागात अनेक गणेश चित्रशाळा असल्यामुळं तिथून गणेशमूर्ती मंडपात नेणाऱ्यांची लगबग आणि त्यातच गणेशोत्सवाच्या खरेदीसाठी रस्त्यांवर निघालेले सामान्य नागरिक असं एकंदर चित्र लालबाग परिसरात रविवारी पाहायला मिळालं. इथं उत्साह शिगेला असतानाच या उत्साहाला गालबोट लावणारी एक घटना घडली आणि अनेकांना धक्काच बसला. 

लालबागचा राजा येथे गरम खाडा परिसरातील मुख्य रस्त्यावर बीएसटी बस पादचाऱ्यांच्या गर्दीत घुसली आणि एकच गोंधळ माजला. बसमधील मद्यधुंद अवस्थेतील एका प्रवाशानं चालकासोबत वाद झाल्यानंतर स्टेअरिंग जबरदस्तीनं वळवली आणि त्यामुळंच हे संकट ओढावलं. हा अपघात इतका भीषण होता की, रस्त्यावरील अनेक वाहनांचं नुकसान होण्यासोबतच जवळपास 9 प्रवाशांना बसनं धडक दिली. यामध्ये 28 वर्षीय तरुणीचा मृत्यू झाल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. उपलब्ध माहितीनुसार 9 पैकी 8 जणांवर रुग्णालयात उपचार करून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. 

हेसुद्धा वाचा : Ganesh Chaturthi 2024 : गणेशोत्सवासाठी मुंबई- गोवा महामार्गच नव्हे, 'या' पर्यायी मार्गांनी गाठता येईल कोकण; Traffic Jam टाळण्यासाठी आताच पाहून घ्या 

बेस्टच्या 66 क्रमांकाच्या इलेक्ट्रीक बसला हा अपघात घडला असून, ही बस सायनच्या राणी लक्मीबाई चौकातून दक्षिण मुंबईतील बॅलार्ड पियर इथं जात होती. बसमध्ये चढलेल्या मद्यधुंद अवस्थेतील प्रवाशांचा चालकासोबत वाद झाला आणि क्षणात हा वाद विकोपास गेला. बस लालबागला पोहोचताच प्रवाशानं स्टेअरिंग दुसरीकडे वळवलं आणि चालकाचंही संतुलन बिघडवल्यामुळं हा अपघात घडला. 

सदर अपघातानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी मद्यधुंद अवस्थेतील प्रवाशाला ताब्यात घेत घटनेचा पुढील तपास सुरू केला. दत्ता शिंदे असं या इसमाचं नाव असल्याची माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान, बसमघ्ये घडलेल्या या प्रकारामुळं प्रवाशांनाही धडकी भरली. काही काळ बस रस्त्यावरून वेडीवाकडी चालल्यानं काही प्रवाशांनाही इजा झाल्याचं वृत्त आहे. दरम्यान बेस्ट आणि पोलीस प्रशासनानं या घटनेची दखल घेतली असून, आता पुढील कारवाई करण्यात येत आहे.