कृष्णात पाटील / मुंबई : नगरसेवकांच्या परदेशी अभ्यास दौऱ्यावर आता वाद निर्माण होण्याची चिन्हे आहेत. शिवसेनेच्या नगसेवकांना परदेश दौरा स्वत:च्या पैशातून करावा, अशी मागणी भाजपने केली आहे. मुंबई महापालिकेत शिवसेनेची सत्ता आहे. तसेच राज्यात युती तुटल्याने भाजपला या दौऱ्याच्या निमित्ताने शिवसेनेला कोंडीत पकडण्याचे आयते कोलीत मिळाले आहे. दरम्यान, मुंबई महापालिकेच्या नगरसेवकांना अभ्यास दौऱ्यांचे वेध लागले आहेत. या अभ्यास दौरा चीन देशात होणार आहे.
मुंबई महापालिका आरोग्य समिती सदस्यांचे चीनमधील शांघाय दौऱ्याचे नियोजन करण्यात आले आहे. तर वृक्ष प्राधिकरण समितीने सिंगापूर दौरा ठरवला आहे. महिला व बाल कल्याण समिती केरळला तर सुधार समिती सदस्य अभ्यासासाठी बंगळुरू, म्हैसूर, उटीला जाण्याचे ठरवून आहेत. या अभ्यास दौऱ्यांवर भाजपनं टीका केली आहे. अभ्यास दौरा करायचा असेल तर स्वतःच्या खिशातून करा, अशी मागणी भाजपने केलीय. तर शिवसेनेने या अभ्यास दौऱ्यांचे समर्थन केले आहे.
मुंबई महापालिकेच्या नगरसेवकांची देशविदेशात टूर निघाली आहे. जरी याला अभ्यास दौरा असे गोंडस नाव दिले असले तरी यात अभ्यास कमी आणि पिकनिक जास्त असते, त्यामुळे नेहमीप्रमाणे यावेळेलाही यावरून वाद, टीका होवू लागली आहे. २०१६ मध्ये तत्कालीन महापौर स्नेहल आंबेकर यांच्यासह अनेक नगरसेवकांचा अंदमान निकोबारला गेलेला अभ्यास दौरा प्रचंड गाजला होता. त्यावर चहुबाजूने सत्ताधारी शिवसेनेवर टीका झाली होती. त्यानंतर या टूरचे प्रमाण काही प्रमाणात कमी झाले होते. पालिकेच्या विविध समित्यांमध्ये आता पुन्हा एकदा या अभ्यास दौऱ्यांचे नियोजन सुरू झाले आहे.
आरोग्य समिती सदस्यांना चीनमधील शांघायमध्ये जावून तिथल्या आरोग्य व्यवस्थेचा अभ्यास करायचा आहे. वृक्ष प्राधिकरण समिती सदस्य सिंगापूरला जायचं नियोजन करत आहेत. महिला व बाल कल्याण समिती केरळला तर सुधार समिती सदस्य बंगळुरू, म्हैसूर, उटीला जाण्याचे नियोजित आहे. सत्ताधारी शिवसेना हे अभ्यास दौरे किती महत्वाचे आहेत हे सांगत त्याचे समर्थन करत आहे. सभागृह नेत्या विशाखा राऊत आणि आरोग्य समिती अध्यक्ष अमेय घोले यांनी हा अभ्यास दौरा महत्वाचा आहे. त्याचा मुंबईकरांना फायदाच होणार आहे, असे म्हटले आहे.
दरम्यान, पहारेकरी भाजप आता विरोधात गेल्यामुळे त्यांनी या अभ्यास दौऱ्यासाठीचा खर्च नगरसेवकांनी स्वत:च्या खिशातून करण्याची मागणी केली आहे. तशी भाजप नगरसेवक अनिष मकवानी आणि नेहल शाह यांनी ही मागणी केली आहे.