आरे मेट्रो कारशेडचा मार्ग मोकळा, शिवसेनेला धुडकावत प्रस्ताव मंजूर

मुंबईतील आरेच्या मेट्रो कारशेडचा मार्ग मोकळा झाला असला तरी त्यावरुन आता वाद.

Updated: Aug 29, 2019, 05:55 PM IST
आरे मेट्रो कारशेडचा मार्ग मोकळा, शिवसेनेला धुडकावत प्रस्ताव मंजूर title=
संग्रहित छाया

मुंबई : आरेच्या मेट्रो कारशेडचा मार्ग मोकळा झाला असला तरी त्यावरुन आता वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. शिवसेनेच्या विरोधानंतरही २१८५ झाडे तोडण्याचा प्रस्ताव वृक्ष प्राधिकरण समितीत मंजूर झाला आहे. त्यामुळे सत्तेत असूनही शिवसेनेची मोठी नाचक्की झाली आहे. या निर्णयाविरोधात शिवसेना न्यायालयात जाणार आहे.  सत्ताधारी शिवसेनेला प्रस्ताव मंजूर करण्यात आल्याने  जोरदार दणका बसला आहे. त्यामुळे शिवसेना आक्रमक झाली असून न्यायालयात आव्हान देण्याच्या तयारीत आहे.

भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस आणि तज्ज्ञ सदस्यांनी प्रस्तावाच्या बाजूने मतदान तर शिवसेनेने प्रस्तावाच्या विरोधात मतदान केले आहे. काँग्रेसने मतदानावर बहिष्कार टाकला. ८ विरूद्ध ६ मतांच्या फरकाने प्रस्ताव मंजूर झाला. गेल्यावेळच्या वृक्षप्राधिकरण समितीत शिवसेनेच्या विरोधानंतर प्रस्ताव मंजूर केला नव्हता. पण यावेळी वृक्ष प्राधिकरणाचे अध्यक्ष आणि आयुक्त प्रविण परदेशी यांनी नियोजनपूर्वक प्रस्ताव मंजूर करून घेतल्याने शिवसेनेची नाचक्की झाली आहे.

सत्तेत असतानाही शिवसेना प्रस्ताव नामंजूर करुन घेऊ शकली नाही. आयुक्त प्रविण परदेशी राष्ट्रवादी काँग्रेसला प्रस्तावाच्या बाजूने वळवण्यात तर काँग्रेसने बहिष्कार टाकावा, अशी व्यूहरचना करण्यात आयुक्तांना यश आले. दरम्यान या निर्णयाविरोधात न्यायालयात जाणार असल्याचे स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांनी सांगितले आहे.