Mumbai Mono Railway News : एप्रिल महिन्यात मोनो रेल्वेच्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. मोनो रेल्वेने प्रवास करणाऱ्या नागरिकांचा प्रवास जलद होणार आहे. पिक अवर्सदरम्यान आता मोनो रेल्वेच्या फेऱ्या वाढवण्यात येणार आहे. यासाठी मोनो रेल्वेच्या ताफ्यात एक नवीन रेक सामील होणार आहे. मेक इन इंडियाअंतर्गंत हैदराबाद येथे मोनोच्या एका रेकचे निर्माण कार्य पूर्ण करण्यात आले आहे. मोनोची ही नवीन रेक मार्चच्या शेवटच्या आठवड्यात किंवा एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात मुंबईत येऊ शकतो. आणखी एक गाडी ताफ्यात दाखल झाल्याने मोनोच्या फेऱ्या वाढवल्या जाऊ शकतात.
2014मध्ये मोनो रेल्वे सेवा सुरू करण्यात आली होती. मोनोच्या लोकार्पणानंतर अद्याप एकही नवीन ट्रेन आणण्यात आली नव्हती. त्यामुळं प्रवाशांना ट्रेनसाठी खूप वाट पाहावी लागत होती. फेऱ्या कमी असल्याने मोनोला प्रवाशांचा प्रतिसादही कमी मिळत होता. प्रवाशांची संख्या कमी असल्याने प्रशासनासाठी मोनो पांढरा हत्ती ठरला होता. प्रवाशांचा प्रतिसाद नसल्याने मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए)ला मोनो रेल्वेमुळं आत्तापर्यंत 500 कोटींचा तोटा सहन करावा लागला आहे.
मोनो रेल्वेला आर्थिक फटका बसल्याने आणि तोटा भरुन काढल्याने मोनोच्या फेऱ्या वाढवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी मोनोच्या फेऱ्या वाढवण्यासाठी एमएमआरडीएने 10 नव्या रेकची ऑर्डर दिली होती. या 10 रेकपैकी एक रेक आगामी काही दिवसांत मुंबईत पोहोचणार आहे.
आधीच तोट्यात असणारी मोनो रेलला तोट्यातून बाहेर काढण्यासाठी एमएमआरडीए नवीन गाड्यांचा वापर फक्त पिक अवर्सच्या वेळीच करणार आहे. मोनोने रोज 16 हजार प्रवासी प्रवास करतात. यातील बहुतांश अधिकारी पिक अवर्समध्येच प्रवास करतात. चेंबूर ते संत गाडगे महाराज चौक (सात रस्ता) दरम्यान मोनो रेल धावते. 20 किमी असलेल्या या मार्गावर दररोज 142 फेऱ्या धावतात. नवीन गाडी आल्यानंतर मोनो रेलच्या फेऱ्या वाढवण्यात येणार आहे. त्यामुळं प्रवाशांचा चांगला प्रतिसादही मिळणार आहे.
मोनोला पुन्हा नफ्यात आणण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न करण्यात येत आहे. मोनोला रेल्वे स्थानक आणि नव्याने तयार होणाऱ्या मेट्रो लाइनला कनेक्ट करण्यात येण्याची योजना विचारधीन आहे. त्यामुळं लवकरच मेट्रो आणि लोकलला मोनो कनेक्ट होण्याची शक्यता आहे. यामुळं मोनोच्या प्रवासी संख्येत वाढ होऊ शकते.