मुंबई : शहरात मेट्रोचे जाळे उभारण्यावर भर देण्यात येत आहे. मुंबई मेट्रो मार्ग-४ चा विस्तार कासारवडवली ते गायमुख (४अ) असा करण्यात येणार आहे. या विस्तारीत मेट्रो रेल्वे प्रकल्पाची अंमलबजावणी करण्यासाठी राज्य मंत्रिमंडळाने आजच्या बैठकीत मंजुरी दिली. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने मान्य केलेल्या मेट्रो बृहत् आराखड्यातील मेट्रो मार्ग ४ वडाळा - घाटकोपर - मुलुंड - ठाणे - कासार वडवली या प्रकल्पाला राज्य शासनाने यापूर्वीच मान्यता दिली आहे. मात्र, ठाणे - घोडबंदर रस्त्याच्या दुतर्फा होणारे नागरीकरण आणि या भागात होणारी वाहतूक कोंडी लक्षात घेऊन हा परिसरही मेट्रो सेवेने जोडण्याचे निश्चित करण्यात आले आहे.
#मंत्रिमंडळनिर्णय#CabinetDecision
मेट्रो गतिमान : मुंबई मेट्रो
मार्ग 4 अ ला मंजुरी pic.twitter.com/bHZY4gi30F— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) December 27, 2018
त्यानुसार दिल्ली मेट्रो रेल्वे महामंडळाने तयार केलेला मेट्रो मार्ग ४ अ कासारवडवली - गायमुख (मेट्रो मार्ग ४ चा विस्तार) हा सुधारित प्रकल्प अहवाल एमएमआरडीएने आज सादर केला. या प्रकल्प अहवाला राज्य मंत्रिमंडळाने मंजुरी दिली. मेट्रो मार्ग '४ अ'साठी जून २०१७ मध्ये ९४९ कोटी रुपये खर्चाला प्रशासकीय मान्यता देण्यात आली. हा प्रकल्प मार्च २०२२ पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे.