मुंबई : कॅप्टन अमोल यादव यांच्या स्वदेशी बनावटीच्या विमानाला सोमवारी परवानगी मिळाली. या विमानाचे नाव अखेर अमोल यादव यांनी ठरवले आहे.
अमोल यादव यांनी आपल्या विमानाला VT-NMD हे नाव दिलं आहे. ह्या नावातील NMD चा अर्थ ‘नरेंद्र मोदी देवेंद्र’ असा आहे. २०११ पासून नोंदणीसाठी अर्ज करूनही काम आता झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विशेष प्रयत्नामुळे विमानाचं स्वप्न पूर्णत्वास आल्यामुळे आपण त्यांचं नाव दिल्याची प्रतिक्रिया कॅप्टन अमोल यादव यांनी व्यक्त केली.
“भारतातील विमानं VT ने रजिस्टर होतात. त्यानंतरची तीन अक्षरं आवडीनुसार ठेवण्याची मुभा असते. २०११ मी नोंदणीसाठी अर्ज केला होता. परंतु नोंदणीच्या कामात दिरंगाई, ढिसाळपणा दिसला. यामुळे देशाचं बरंच नुकसान झालं होतं. हे विमान २०१६ मध्ये मेक इन इंडियामध्ये सादर केलं होतं. मुख्यमंत्री आणि पंतप्रधांनी यांनी या प्रकल्पाला पाठिंबा दिला, सहकार्य केलं. त्यांच्यामुळे देशाचं मोठं नुकसान टळलं. त्यामुळे विमानाच्या नावातील NMD हे नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नावाचं कॉम्बिनेशन आहे,” असं अमोल यादव यांनी सांगितलं.
‘मेक इन इंडिया’ अंतर्गत तयार केलेल्या अमोल यादव त्यांच्या सहाआसनी विमानाची परवानगी तांत्रिक कारणामुळे रखडली होती. अखेर १७ नोव्हेंबरला डायरेक्टर जनरल ऑफ सिव्हील एव्हिएशन विभागाने अमोल यादव यांच्या विमानाचं रजिस्ट्रेशन करुन घेतलं. आता स्वदेशी विमानाने प्रवास करणे शक्य होणार आहे.