मुंबई : मालाडच्या मालवणी परिसरामध्ये बांधण्यात आलेल्या क्रीडा मैदानाच्या नावावरुन महाविकास आघाडी सरकार आणि भाजपामध्ये नवा वादाला सुरुवात झाली आहे. काँग्रेसचे स्थानिक आमदार आणि मुंबई शहराचे पालकमंत्री अस्लम शेख यांच्या आमदार निधीतून या मैदानाचं काम करण्यात आलं आहे.
भाजपचं तीव्र आंदोलन
मालाडच्या मालवणी परिसरातील या क्रीडा मैदानाचं वीर टिपू सुलतान क्रीडासंकुल असं नामकरण करण्याचे प्रयत्न सत्ताधारी काँग्रेसकडून केले जात आहेत. याचा लोकार्पण सोहळा आज होणार आहे. मात्र त्यापूर्वी भाजपनं तिथं जोरदार आंदोलन केलं आहे. मुंबई भाजपचे अध्यक्ष मंगलप्रभात लोढा यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात येत आहे.
पोलिसांनी मोर्च्याला अडवल्यानंतर भाजप कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाली. टिपू सुलतानच्या नावाला भाजपने तीव्र विरोध केला आहे. मैदानाला टिपू सुलतानचं नाव दिलं तर काढून टाकू आणि त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचं देऊ असा इशारा भाजपने दिला आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भूमिका जाहीर करावी, भाजपवर हिंदुत्वावरुन टीका केली, मग आता आपली टिपू सुलतानच्याबाबतीत आपलं काय म्हणणं आहे जनतेला कळू द्या असं आव्हान भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी केलं आहे. हिंदुत्वाशी भारतीय जनता पार्टीने कधीही तडजोड केलेली नाही, मुख्यमंत्र्यांनी तात्काळ हस्तक्षेप करावा, असं आव्हानही प्रवीण दरेकर यांनी केलेलं आहे.
नेमका वाद काय?
मालाडच्या मालवणी परिसरातील या क्रीडा मैदानाचं वीर टिपू सुलतान क्रीडासंकुल असं नामकरण करण्याचे प्रयत्न सत्ताधारी काँग्रेसकडून केले जात आहेत. याचा लोकार्पण सोहळा दि. 26 जानेवारी रोजी करण्यात येणार असल्याच्या आशयाचे फलक मालवणी परिसरात लावण्यात आले आहेत.
भाजपाचा तीव्र विरोध
क्रीडांगणाला टिपू सुलतानचं नाव देण्यावरुन भाजपने तीव्र विरोध केला आहे. भाजप आमदार राम कदम यांनी यामुद्दयावर थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लक्ष्य केलं आहे. जर ठाकरे सरकारच्या नेतृत्त्वात त्यांच्या मंत्र्यांनी मैदानाचं उद्घाटन केलं तर नाईलाजास्तव आम्हाला टिपू सुलतान नावाच्या फलकावर काळं पुसावं लागेल असा इशारा राम कदम यांनी दिला आहे.
हिंदुंचा नरसंहार करुन आमच्या मंदिरांना ध्वस्त करणाऱ्या आक्रमणकारी टिपू सुलतानचा सन्मान आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमीत खपवून घेणार नाही असं राम कदम यांनी म्हटलं आहे. हे कोणतं हिंदुत्व आहे, ज्यांनी हिंदुंवर अत्याचार केले, तेदेखील कबरीतून उठून शिवसेनेचा जयघोष करती, असा टोला राम कदम यांनी लगावला आहे.
विश्व हिंदू परिषदेचा इशारा
टिपू सुलतान सुल्तान हिंदू विरोधी होता. त्याने हिंदूंची अनेक मंदिरे उध्वस्त केली, हजारो हिंदूंचे धर्मांतरण केले तसंच अनेक हिंदूंची क्रूरपणे हत्या केली आहे. अशा क्रूर आणि हिंदू विरोधी टिपू सुलतानचं नाव क्रीडा मैदानास देण्यास आमचा विरोध आहे. हे नामकरण त्वरित थांबविण्यात यावं, असं निवेदन विश्व हिंदू परिषदेने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिलं आहे