Mumbai Local Train Update: पावसाळा सुरू झाला की लोकलचा खोळंबा हा नेहमीचा ठरलेलाच आहे. रेल्वे रूळांवर पाणी साचल्यामुळं लोकल सेवा ठप्प होते किंवा कधी तांत्रिक बिघाडामुळं लोकल सेवा विस्कळीत होते. मात्र, यंदाच्या पावसाळ्यात लोकलचा खोळंबा टाळण्यासाठी पश्चिम रेल्वे सज्ज आहे. पावसाळ्यापूर्वीची बहुंताश कामे पूर्ण झाली आहेत. तर, उर्वरित कामे युद्धपातळीवर पूर्ण करण्यात येत आहेत, अशी माहिती पश्चिम रेल्वेने दिली आहे. (Mumbai Monsoon Update)
मुंबईसह महाराष्ट्रात मान्सूनला सुरुवात झाली आहे. मराठवाड्यात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. तर मुंबईतही पावसाला सुरुवात झाली आहे. दरवर्षी मुसळधार पावसामुळं मुंबई लोकलचा वेग मंदावतो तर कधी कधी रुळांवर पाणी साचल्यामुळं ट्रेन ठप्प होते. अशावेळी रेल्वेकडून आधीपासूनच कामे हाती घेतली जातात. यंदाही रेल्वे प्रशासनाने कामे हाती घेतली आहेत. विशेषतः रेल्वेच्या ट्रॅकच्या स्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी गस्त घातली जाणार आहे. हवामानाशी संबंधित माहिती मिळवण्यासाठी हवामान खात्यासोबतच महापालिकेच्या यंत्रणांशी समन्वय राखल जाईल, पश्चिम रेल्वेकडून सांगण्यात आले आहे.
कलव्हर्ट, नाले आणि नाल्यांची साफसफाई, गाळ काढणे, रुळांच्या बाजूने घाण आणि कचरा साफ करणे, अतिरिक्त जलमार्ग बांधणे, उच्च क्षमतेच्या पंपांची तरतूद करणे, झाडांची छाटणी करणे इत्यादी कामे युद्धपातळीवर पूर्ण करण्यात येत आहे. वांद्रे आणि बोरीवली येथील कलव्हर्टची स्वच्छता सुनिश्चित करण्यासाठी डी-स्लडिंग मशीनचा वापर करण्यात आला आहे. प्रभादेवी-दादर सेक्शन, दादर-माटुंगा रोड सेक्शन, वांद्रे टर्मिनस यार्ड, गोरेगाव-मालाड सेक्शन, बोरिवलीत पावसाच्या पाण्याचा निचरा करण्यासाठी १२०० किंवा १८०० मिमी व्यासाचे १५ पाइप बसवण्यात आले. पाण्याचा सुरळीत निचरा होण्यासाठी ११ ठिकाणी नाले बांधले जात आहेत. चर्टगेट ते विरारदरम्यान दादर, अंधेरी, बोरिवली आणि भाईंदर स्थानकात एकूण 100 पंप कार्यान्वित केले आहेत.
मुसळधार पावसात पावसाचे पाणी भरल्यास गर्दीचे प्रमाण एका ठिकाणी वाढते. त्यामुळं एकाच ठिकाणी जास्त गर्दी होते. ही परिस्थिती लक्षात घेता उद्घोषणेद्वारे गर्दी कमी करण्याची घोषणा केली जाणार आहे. तसंच, सीसीटीव्हीद्वारे गर्दीच्या ठिकाणांवर लक्ष ठेवले जाणार आहे. रेल्वे स्टॉलवर खाद्यपदार्थाच्या वस्तु जास्त प्रमाणात ठेवण्यात येणार आहे.