Mumbai Local Train Update: मुंबई लोकल ही मुंबईकरांची लाइफलाइन आहे. पण हिच लाइफलाइन तब्बल 35 दिवस विलंबाने धावणार आहे. आजपासून पश्चिम रेल्वेवर 35 दिवसांचा मेगाब्लॉक घेण्यात येत आहे. त्यामुळं प्रवाशांना आता प्रवासाची कसरत करावी लागणार आहे. गोरेगाव ते कांदिवलीदरम्यान पश्चिम रेल्वेवर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. २७-२८ ऑगस्टच्या मध्यरात्रीपासून ५-६ ऑक्टोबरपर्यंत हा ब्लॉक सुरू राहील. मेगाब्लॉक नेमका का घेण्यात येतोय? व पश्चिम रेल्वेचे नियोजन कसे असेल? याची संपूर्ण माहिती जाणून घ्या.
पश्चिम रेल्वेवर गोरेगाव ते कांदिवलीदरम्यान सहाव्या मार्गिकेचे काम हाती घेण्यात आले आहे. याच कामासाठी 35 दिवसांचा मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. गोरेगाव – कांदिवली विभाग हा वांद्रे टर्मिनस आणि बोरिवली दरम्यानच्या पाचव्या/सहाव्या मार्गाचा भाग आहे. वांद्रे टर्मिनस – बोरिवलीदरम्यान पाचवी मार्गिका आणि खार रोड – गोरेगावदरम्यान सहावी मार्गिका सुरू झाली आहे. तर आता गोरेगाव – कांदिवली स्थानकांदरम्यान सुमारे ४.५ किमी लांबीच्या सहाव्या मार्गाचे काम सुरू होणार आहे. त्यामुळं 35 दिवसांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे.
क कालावधीतच्या ५ व्या, १२ व्या, १६ व्या, २३ व्या आणि ३० व्या दिवशी पाच महत्त्वाचे १० तासांचे ट्रॅफिक ब्लॉक घेण्यात येणार आहेत. या ब्लॉक कालावधीत सुमारे १०० ते १४० लोकल सेवा रद्द करण्यात येणार आहेत, तर, ४० लोकल सेवा अंशत: रद्द करण्यात येणार आहेत. या ३५ दिवसांच्या मोठ्या ब्लाॅक कालावधीत कमीत कमी लोकल फेऱ्या रद्द करणे अपेक्षित आहे. तसेच आठवड्यातील शेवटच्या दिवशी ५ ते ६ दिवसांच्या ब्लॉकमध्ये सुमारे ८० लोकल फेऱ्या रद्द करण्यात येणार आहेत. तर, ७० लोकल फेऱ्या अंशत: रद्द करण्यात येणार आहेत, अशी माहिती रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.
दरम्यान, सध्या मुंबईत गणेशोत्सवाची लगबग पाहायला मिळतेय.त्यामुळं या ब्लॉकमुळं प्रवाशांचा तारांबळ उडण्याची भिती व्यक्त केली जात होती. मात्र, प्रशासनाने भाविकांना एक सुखद धक्का दिला आहे. ३५ दिवसांच्या ब्लॉकमध्ये गणेशोत्सवातील ७ ते १७ सप्टेंबरदरम्यानच्या कालावधीत प्रस्तावित कोणतेही काम केले जाणार नाही. त्यामुळे लोकल सेवा नियोजित वेळापत्रकानुसार चालवण्यात येईल.
पश्चिम रेल्वेवरील एक मार्गिका अपग्रेड करण्यात येत आहे. या सहाव्या मार्गिकेमुळं लोकलवरील ताण हलका होणार आहे. तसंच, प्रवाशांची गैरसोय कमी होणार आहे. सध्या वांद्रे टर्निनस ते गोरेगाव या नऊ किमीच्या सहाव्या मार्गिकेचे काम पूर्ण झाले आहे. दुसरा टप्पा हा गोरेगाव ते कांदिवलीदरम्यानचा आहे. तर, यानंतर कांदिवली ते बोरीवलीदरम्यानचे काम हाती घेण्यात येणार आहे. या मार्गिकेमुळं लोकलच्या वक्तशीरपणात सुधारणा होणार आहे. जास्त गाड्या धावण्यासाठी अतिरिक्त मार्ग उपलब्ध असणार आहे.