लोकल सर्वांसाठी खुली करण्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांचे सूचक विधान

लोकल सुरु करण्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे सूचक विधान 

Updated: Jan 25, 2021, 07:47 PM IST

मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभुमीवर सध्या अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी आणि महिलांसाठी ठराविक वेळेत लोकल ट्रेन सुरु आहेत. दरम्यान कार्यालये खुली झाल्याने आता सर्वांसाठी ट्रेन खुली करण्याची मागणी जोर धरु लागली आहे. या पार्श्वभुमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सूचक विधान केलंय. मुंबईतील लोकल सेवा सर्वांसाठी खुली करण्यासंदर्भातील निर्णय लवकरच घेण्यात येईल असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय. 

कोरोना लस आली असली तरी अद्याप कोरोनाचा प्रादुर्भाव पूर्णपणे संपला नाहीय. रुग्णसंख्येची आकडेवारी कमी झाली असली तरी कोरोनाचे संकट कायम आहे. यामुळे सोशल डिस्टन्सिंग, मास्क वापरण, हाथ धुणं या गोष्टींचे पालन करण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलंय.

मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली नुकत्याच झालेल्या बैठकीनंतर ते बोलत होते. या बैठकीत सचिव संजय कुमार,  मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार अजोय मेहता,  मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, प्रधान सचिव विकास खारगे, सचिव आबासाहेब जराड,  बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त इक्बालसिंह चहल आणि आपत्ती व्यवस्थापन संचालक अभय यावलकर यांच्यासह मध्य आणि पश्चिम रेल्वेचे अधिकारी, मुंबई पोलीस आयुक्त परम बीर सिंह, यांच्यासह आरोग्य विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.