Mumbai News : रविवारचा दिवस अनेकांसाठी सुट्टीचा असला तरीही काही मंडळींसाठी मात्र हाच सुट्टीचा दिवस भटकंतीचा असतो. त्यातही शहराच म्हणजे मुंबईत प्रलास करायचा असेल तर, सुट्टीच्या दिवशी तरी किमान वाहतूक कोंडीत अडकायला नको यासाठी ही मंडळी मुंबई रेल्वेलाच प्राधान्य देतात. पण, दर रविवारी काही तांत्रिक आणि दुरुस्तीच्या कामांसाठी रेल्वे विभागाकडून मेगाब्लॉक घेतला जात असल्यामुळं अनेकांनाच काही अडचणींचा सामना करावा लागतो. अशा मंडळींना 1 ऑक्टोबरच्या रविवारी मोठा दिलासा मिळणार आहे.
मध्य रेल्वेच्या हार्बर मार्गावर आजपासून 2 ऑक्टोबरपर्यंत 38 तासांचा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. डेडीकेटेड फ्रेट कॉरिडॉरच्या 2 नवीन अप आणि डाऊन लाईन्सच्या बांधकामासह रीमॉडेलिंग कामासाठी हा ब्लॉक घेण्यात येतोय. असं असलं तरीही इतर मार्गांवर मात्र मेगाब्लॉक नसेल.
रविवारी मध्य रेल्वेवर कोणताही रुटीन मेगा ब्लॉक होणार नसल्याचं मध्ये रेल्वेनं जाहीर केलं आहे. परिणामी CSMT ते कल्याण मुख्य मार्ग आणि CSMT ते पनवेल हार्बर मार्गावर, तसंच नेरूळ बेलापूर, खारकोपर या उपनगरीय सेक्शनवरही रविवारी मेगा ब्लॉक नसेल, त्यामुळं प्रवाशांसाठी हा मोठा दिलासा ठरत आहे.
इथं मेगाब्लॉक नसल्याचा दिलासा मिळालेला असतानाच दुसरीकडे रेल्वे विभागाकडून चाकरमान्यांनाही दिलासा दिला आहे. गणेशोत्सवानंतर कोकणातून मुंबईत येणाऱ्या चाकरमान्यांच्या सोयीसाठी मडगाव ते पनवेल आणि पनवेल ते खेड दरम्यान मेमू चालविण्याचा निर्णय कोकण रेल्वेने घेतला आहे. या गाड्या अनारक्षित असल्यामुळे प्रवाशांना यातून प्रवास करता येणार आहे.
इतक्यावरच न थांबता रेल्वेची आणखी एक भेटही तुमच्या प्रतीक्षेत आहे. मध्य रेल्वेने प्रवाशांच्या सोयीसाठी दसरा, दिवाळी आणि छट पूजेनिमित्त विशेष गाड्यांच्या कालावधीत वाढ केली आहे. दादर-काझीपेठ साप्ताहिक विशेष रेल्वे 30 नोव्हेंबरपर्यंत चालवण्यात येईल. तर काझीपेठ- दादर साप्ताहिक रेल्वे 29 नोव्हेंबरपर्यंत चालवण्यात येईल. थोडक्यात रेल्वेनं सर्व स्तरांतील प्रवाशांना केंद्रस्थानी ठेवतच हे निर्णय घेतले आहेत.