दुप्पट पैसे मिळण्याच्या आमिषाने पैसे गुंतवताय ? हे नक्की वाचा

 दुपट्ट पैसे मिळवण्याच्या मोहात तुम्ही कुठे गुंतवणूक करत असाल तर सावधान ! 

Updated: Jan 7, 2021, 10:45 AM IST
दुप्पट पैसे मिळण्याच्या आमिषाने पैसे गुंतवताय ? हे नक्की वाचा title=

गणेश कवडे, झी 24 तास, मुंबई : जलद गतीने दुपट्ट पैसे मिळवण्याच्या मोहात तुम्ही कुठे गुंतवणूक करत असाल तर सावधान ! कारण अशा प्रकारच्या फसवणुकीचा भांडाफोड खार पोलिसांनी केलाय. ब्रिटिश नागरिक इसा अहमद खान असे पकडलेल्या आरोपीचे नाव असून तो ब्रिटीश नागरिक असल्याचा पोलिसांना संशय आहे. इसाने EA Rarcoa collection private limited  या नावाने मुंबई आणि बंगळूर येथे कंपनी स्थापन करुन लोकांना लाखोंचा गंडा घातला.

दुर्मिळ नाण्यांच्या खरेदी विक्रीतून काही महिन्यात दुप्पट परतावा करतो असे आमिष इसाने आपल्या कंपन्यांच्या माध्यमातून गुंतवणूकदारांना दाखवले. यामध्ये मुंबईमधील एका नागरिकाने 72 लाख रुपयांची गुंतवणूक केली होती.

मात्र काही महिन्याने पैसे मिळणे बंद झाले. त्यानंतर इसाविरोधात फसलेल्या गुंतवणुकदारांनी खार पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी तपास करण्यासाठी सुरवात केली. हा सर्व प्रकार बंगळूरमधून चालायचा. 

पोलिसांनी युबीसीटी बंगळूर येथील कार्यालयातून डिझाईन कॉईन बनविण्याचे डाय, कंपनीचे ब्रोशर्स, व्हिजिटिंग कार्ड्स तसेच वेगवेगळ्या देशाचे आणि चित्रांचे 917 दुर्मिळ कॉईन हस्तगत केले आहेत. तसेच आरोपीचे विविध 06 बँक खात्यामधील1 कोटी 11 लाख 47 हजार रुपये गोठविले आहेत.

दुर्मिळ नाणे मुंबईमधील जुन्या बाजरातून विकत घेऊन देणाऱ्या आमिर याकूब शेख 30 वर्षीय या आरोपीला अटक करण्यात आलीय. मुख्य आरोपी फरार आहे. ब्रिटिश पासपोर्ट असला तरी तो पाकिस्तानी नागरिक असल्याचा  पोलिसांना संशय आहे. आरोपींनी आतापर्यत 15 ते 16 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचे उघड झालंय. जर अशाप्रकारे तुमची फसवणूक झाली असेल तर पोलिसांशी संपर्क करा असे आवाहन करण्यात आलंय.