मुंबई उच्च न्यायालयाकडून मुख्यमंत्री सहाय्यता निधीस २.५१ कोटी रुपयांची मदत

मुंबई उच्च न्यायालयाने मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये २ कोटी ५१ लाख रुपयाचा निधी जमा केला आहे.  

Updated: May 8, 2020, 03:02 PM IST
मुंबई उच्च न्यायालयाकडून मुख्यमंत्री सहाय्यता निधीस २.५१ कोटी रुपयांची मदत title=

मुंबई : मुंबई उच्च न्यायालयाने मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये २ कोटी ५१ लाख रुपयाचा निधी जमा केला आहे. मुंबई उच्च न्यायालयाचे विद्यमान तसेच माजी न्यायाधीश, मुंबई उच्च न्यायालयाचे कर्मचारी, न्यायिक अधिकारी, न्यायपालिकेच्या अधिनस्त काम करणारे कर्मचारी यांनी सर्वांनी मिळून हा निधी दिला आहे. आतापर्यंत मुख्यमंत्री सहाय्यता निधीत एकूण ३१४ कोटी रुपये जमा झाले आहेत. 

मुंबई उच्च न्यायालयाचे विद्यमान तसेच माजी न्यायाधीश,  मुंबई उच्च न्यायालयाचे कर्मचारी, न्यायिक अधिकारी, न्यायपालिकेच्या अधिनस्त काम करणारे कर्मचारी यांनी सर्वांनी मिळून मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी २ कोटी ५१ लाख रुपयांची मदत केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयाच्या सर्व आजी-माजी न्यायधीशांना, कर्मचारी तसेच न्यायिक अधिकारी आणि अधिनस्त कर्मचाऱ्यांना त्यांनी केलेल्या मदतीसाठी धन्यवाद दिले आहेत.

ठाणे जिल्हा  बँकेची १ कोटी रुपयांची मदत

ठाणे जिल्हा सहकारी बँक लिमिटेडने ही मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी एक कोटी रुपयांची रक्कम दिली आहे. या मदतीसाठी मुख्यमंत्र्यांनी बँकेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे आभार मानले आहेत. ज्येष्ठ नागरिक  रवींद्र धनंजय चौधरी यांनी ५० हजार रुपयांची मदत केली आहे. मी एक ज्येष्ठ नागरिक असून  मी आणि माझा परिवार घरातच राहातो, बाहेर पडत नाही, कोरोना विषाणूशी लढतांना सगळ्यांनी असंच  वागलं पाहिजे, शासनाला सहकार्य केलं पाहिजे, असे आवाहन केले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चौधरी यांना मनापासून धन्यवाद दिले आहेत.

दरम्यान, आतापर्यंत राज्यातील जनता, स्वंयसेवी संस्था, उद्योजक, व्यापारी वर्ग, लहान बालके आणि कार्पोरेट हाऊसेस यांनी सगळ्यांनी मिळून केलेल्या मदतीमुळे मुख्यमंत्री सहाय्यता निधीत ३१४ कोटी रुपयांची रक्कम जमा झाली आहे.  राज्यातील बालके असोत, शासनाला या आपत्कालीन परिस्थितीत मदत करणाऱ्या सर्वांच्या दातृत्वाला मला मनापासून सलाम करावा वाटतो. या सर्वांच्या सहकार्याने, स्वंयशिस्तीचे आणि नियमांचे कडक पालन करून आपण कोरोनाला नक्की हरवू, असा विश्वास मुख्यमंत्री  ठाकरे यांनी व्यक्त केला आहे.