कोण आहेत भाजपचे विधानपरिषदेचे उमेदवार?

विधानपरिषदेसाठी भाजपकडून प्रस्थापित नेत्यांना संधी नाही

Updated: May 8, 2020, 02:32 PM IST
कोण आहेत भाजपचे विधानपरिषदेचे उमेदवार? title=

मुंबई :  विधानपरिषद निवडणुकीसाठी भाजपने प्रवीण दटके, गोपीचंद पडळकर, अजित गोपछडे, रणजितसिंह मोहिते पाटील यांना उमेदवारी घोषित केली आहे. पक्षातील नवे आणि काही पक्षाबाहेरून आलेल्यांना संधी देताना भाजपने विधानपरिषदेसाठी इच्छुक असलेल्या एकनाथ खडसे, पंकजा मुंडे, विनोद तावडे, चंद्रशेखर बावनकुळे, प्रकाश मेहता अशा दिग्गज नेत्यांना डावललं आहे.

धनगर समाजाचे नेते आणि लोकसभेत वंचित बहुजन आघाडीकडून सांगलीतून निवडणूक लढवणारे गोपीचंद पडळकर विधानसभेच्या निवडणुकीत बारामतीतून अजित पवार यांच्याविरुद्ध निवडणूक लढले होते. तेथे त्यांचा पराभव झाल्यानंतर त्यांना विधानपरिषदेवर संधी देण्यात आली आहे. पडळकर देवेंद्र फडणवीस यांचे समर्थक मानले जातात. पडळकर यांना संधी देतानाच धनगर समाजाचं नेतृत्व करणाऱ्या राष्ट्रीय समाज पक्षाच्या महादेव जानकर यांना शह देण्यात आल्याचे मानले जाते. जानकर हे पंकजा मुंडे यांचे निकटवर्तीय मानले जातात.

भाजपकडून दुसरं महत्वाचं नाव आहे ते रणजितसिंह मोहिते पाटलांचं. मोहिते-पाटील घराणे सोलापूरमधलं राजकीय प्रस्थ आहे. रणजितसिंह मोहिते पाटलांचे वडील विजयसिंह मोहिते पाटील दीर्घकाळ मंत्री आणि काहीकाळ उपमुख्यमंत्रीही राहिले आहेत. लोकसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देऊन भाजपमध्ये प्रवेश केला. माढा मतदारसंघात भाजपचे उमेदवार रणजितसिंह निंबाळकर यांना निवडून आणण्यात त्यांचा मोठा वाटा होता. त्यामुळे रणजितसिंह निंबाळकर यांनीही मोहिते पाटलांना विधानपरिषदेवर संधी देण्याची मागणी केली होती.

नागपूरचे प्रवीण दटके हे भाजपचे कट्टर कार्यकर्ते आहेत. नागपूरचे माजी महापौर आणि विद्यमान शहराध्यक्ष अशी त्यांची ओळख आहे. संघाचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या महाल भागातून अनेक टर्म नगरसेवक आहेत. विधानसभेला त्यांना उमेदवारी नाकारल्याने नाराजी निर्माण झाली होती. त्यांचे वडीलही संघाचे तसेच जनसंघाचे सक्रिय कार्यकर्ते होते. त्यांना उमेदवारी देऊन एका निष्ठावान कार्यकर्त्याचा सन्मान करण्यात आला आहे.

भाजपचे चौथे उमेदवार डॉ. अजित गोपछडे हे तसे नवखा चेहरा आहे. विद्यार्थी दशेपासून संघाशी निगडित असलेले बालरोगतज्ज्ञ डॉ. गोपछडे नांदेडचे आहेत. अंबाजोगाई इथं वैद्यकीय शिक्षण घेतलेल्या गोपछडे यांनी गोपीनाथ मुंडे यांच्या नेतृत्वाखाली काम केले आहे. सध्या ते भाजपच्या वैद्यकीय आघाडीचे प्रदेशाध्यक्ष आहेत.

 

भाजपच्या यादीत एक मराठा आणि तीन ओबीसी असा मेळ साधण्यात आला आहे. त्याचवेळी सर्व इच्छुक प्रस्थापित नेत्यांना डावलण्यात आले आहे. भाजपची यादी पाहता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा वरचष्मा दिसून येतो. पक्षाबाहेरून आलेल्या दोघांना संधी देण्यात आल्याने डावलण्यात आलेले प्रस्थापित नेते काय भूमिका घेतात याकडेही राजकीय वर्तुळाचे लक्ष आहे.