Video : मुसळधार पावसाचा नेत्यांना फटका; अमोल मिटकरी, अनिल पाटील यांचा थेट रेल्वे रुळांवरून पायी प्रवास

Mumbai Rain Video : मुंबईला मागील 24 तासांपासून मुसळधार पावसानं झोपडून काढलं असून, या पावसाचा फटका आता आमदार आणि मंत्रीमहोदयांना बसताना दिसत आहे.   

सायली पाटील | Updated: Jul 8, 2024, 10:53 AM IST
Video : मुसळधार पावसाचा नेत्यांना फटका; अमोल मिटकरी, अनिल पाटील यांचा थेट रेल्वे रुळांवरून पायी प्रवास   title=
Mumbai heavy rainfall affecting vidhansabha monsoon session amol mitkari and many mlas walking on railway track latest update

Mumbai Rain Video : गेल्या 24 तासांपासून मुंबईत सुरू असणाऱ्या मुसळधार ते अतिमुसळधार पावसानं शहरातील नागरिकांचा खोळंबा केला असून, रेल्वे आणि रस्ते वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाल्याचं चित्र आहे. 

मुंबईतील या मुसळधार पावसाचा मंत्री आणि आमदारांनाही फटका बसताना दिसत आहे. लांब पल्ल्याची एक्स्प्रेस बंद पडल्याने 7 आमदार ट्रेनमध्येच अडकले आहे. विधानपरिषदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या कामकाज सत्रात सहभागी होण्यासाठी ही मंडळी निघाली असून, अपेक्षित स्थळी पोहोचण्यास होणारा उशीर पाहता त्यांनी अखेर रेल्वे रुळावरूनच चालण्याचा पर्याय निवडल्याचं पाहायला मिळालं. 

ट्रेनमधून उतरून आमदार आणि मंत्र्यांनी ट्रॅकवरून पायी प्रवास केला. अधिवेशन सुरू असल्याने वेळेत पोहोचण्यासाठी आमदारांनी पायी चालत मार्ग काढल्याचं पाहायला मिळालं. यामध्ये मंत्री अनिल पाटील, आमदार अमोल मिटकरी, संजय गायकवाड आणि इतर 7 आमदारांचा समावेश असल्याचं पाहायला मिळालं. 

+

लांब पल्ल्याच्या रेल्वे रद्द

मुंबई आणि महाराष्ट्रात सुरू असणाऱ्या या मुसळधार पावसामुळं पुण्यातून मुंबईकडे जाणाऱ्या सहा रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे पुणे रेल्वे स्टेशन परिसरात प्रवाशांची मोठी गर्दी झाली आहे. संपूर्ण दिवस या रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या असून, यामध्ये डेक्कन क्वीन, सिंहगड एक्स्प्रेस, प्रगती एक्स्प्रेस, इंटरसिटी एक्स्प्रेस या रेल्वे गाड्यांचा समावेश आहे. तर, विदर्भ एक्स्प्रेस, दुरांतो एक्स्प्रेस 5 तास उशिराने धावत असल्याची माहिती आहे. 

हेसुद्धा वाचा : Video : ढगफुटीसदृश्य पावसामुळं किल्ले रायगडावरून ओसंडून वाहू लागले जलप्रवाह; पर्यटकांना धडकी 

पावसामुळं मुंबईच सगळीकडे पाणीच पाणी 

मुंबईसह उपनगरात रविवारी रात्रीपासून झालेल्या पावसानं जनजीवन विस्कळीत झाली. पूर्व आणि पश्चिम उपनगरातही जोरदार पाऊस झाला. रात्री 1 ते सकाळी 7 वाजेपर्यंत 300 मिमी पेक्षा जास्त पाऊस झाल्याची नोंद करण्यात आली. रात्रभर पाऊस बरसल्यामुळे ठिकठिकाणी पाणी साचलं. दादर, सायन, माटुंगा, किंग्ज सर्कल, विलेपार्ले, अंधेरी, बोरिवलीत पाणी साचलं, ज्यामुळं नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. 

पावसामुळे रेल्वे आणि रस्ते वाहतुकीलाही फटका बसला. मध्य, हार्बर आणि पश्चिम रेल्वेवरील लोकल वाहतूक धीम्या गतीनं सुरू असून,  रस्त्यांवरही गाड्यांची गती मंदावलीय. इस्टर्न आणि वेस्टर्न एक्स्प्रेसवर वाहतुकीची कोंडी झालीय. त्यामुळे सकाळी कामानिमित्त घराबाहेर पडणाऱ्यांची तारांबळ उडालीय.