मुंबई: लोअर-परळ रेल्वे स्थानकावरील पूल पाडण्यास आजपासून सुरूवात

या पुलाच्या खाली राहणाऱ्या सतरा कुटुंबीयांच्या पुनर्वसनाचा प्रश्न अजूनही सुटलेला नाही

Updated: Aug 20, 2018, 09:33 AM IST
मुंबई: लोअर-परळ रेल्वे स्थानकावरील पूल पाडण्यास आजपासून सुरूवात title=
छायाचित्र सौजन्य: DNA (Aadesh Choudhari)

मुंबई: धोकादायक झाल्यानं गेले महिनाभर बंद असलेला लोअर परळ रेल्वे स्थानकावरील पूल आजपासून पाडण्यात येणार आहे. रेल्वे हद्दीतील गंजलेला पूल तोडण्याच्या कामाला आज सुरुवात होईल. हा पूल तोडण्यासाठी तीन महिन्यांचा कालावधी लागणार आहे. पूल तोडण्यासाठी पश्चिम रेल्वेनं मागवलेल्या निविदेतून कंत्राटदार नेमण्यात आला आहे. या कामासाठी सात कोटी २५ लाखांची निविदा मंजूर झाली आहे. 

पुलाखाली राहणाऱ्या कुटुंबीयांच्या पुनर्वसनाचा प्रश्न कायम

आजपासून सुरु होत असलेलं डीलाइल पुलाचं तोडकाम प्राथमिक टप्प्यातलं आहे. मात्र, या पुलाच्या खाली राहणाऱ्या सतरा कुटुंबीयांच्या पुनर्वसनाचा प्रश्न अजूनही सुटलेला नाही. त्यामुळे या पुला खाली वर्षानुवर्षं राहणारे रहिवासी सध्या चिंतेत आहेत.

 तीन महिन्यात हा पूल पाडण्याचं आव्हान

दरम्यान, तीन महिन्यात हा पूल पाडण्याचं आव्हान रेल्वेसमोर असून त्यासाठी तांत्रिक क्षमतेची कसोटी लागणार आहे. कारण या सगळ्या कामादरम्यान रुळांचं कोणतंही नुकसान होऊ नये याची काळजीही घ्यावी लागणार आहे.