Mumbai Customs Bharti 2023: मुंबईत चांगल्या पगाराची नोकरी शोधत असलेल्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. दहावी ते पदवीपर्यंत शिक्षण झालेल्या उमेदवारांना येथे चांगल्या पगाराची नोकरी मिळणार आहे. मुंबई सीमाशुल्क आयुक्तालयात विविध पदे भरण्यात येणार आहेत. यासाठी नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, पगार, अर्जाची शेवटची तारीख याचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे.
मुंबई सीमाशुल्क आयुक्तालयात टॅक्स असिस्टंटची 18 पदे भरण्यात येतील. यासाठी अर्ज करणारा उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर असावा. त्याच्याकडे कॉम्प्युटर हाताळण्याचा अनुभव असावा.
याससोबतच डेटा एंट्री कामासाठी प्रति तास 8000 शब्दवेग मर्यादा असावी. या पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा 25 हजार 500 ते 81 हजार 100 रुपये इतका पगार दिला जाणार आहे.
हवालदारची एकूण 11 पदे भरली जातील. यासाठी अर्ज करणारे उमेदवार मान्यताप्राप्त शिक्षणसंस्थेतून दहावी उत्तीर्ण असावेत. या पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा 18 हजार ते 56 हजार 900 रुपयांपर्यंत पगार दिला जाईल.
या दोन्ही पदासाठी राज्य किंवा देशाचे प्रतिनिधित्व करणारे खेळाडू/आंतरविद्यालयामध्ये विद्यापीठाचे प्रतिनिधित्व करणारे खेळाडू/अखिल भारतीय शाळेने आयोजित केलेल्या राष्ट्रीय खेळ /खेळांमध्ये भाग घेणारे खेळाडू/राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित खेळाडू अर्ज करु शकतात.
टॅक्स असिस्टंट आणि हवालदार पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 30 नोव्हेंबर 2023 रोजी 18 ते 27 वर्षे असावे. मागासवर्गीय उमेदवारांना यामध्ये 3 ते 5 वर्षांपर्यंत सवलत देण्यात येणार आहे. तसेच उमेदवारांकडून परीक्षा शुल्क घेतले जाणार नाही.
उमेदवारांनी आपले अर्ज कस्टम्स, कार्मिक आणि आस्थापना विभागाचे सहाय्यक/उपायुक्त, 8वा मजला, नवीन कस्टम हाउस, बॅलार्ड इस्टेट, मुंबई- 400001 या पत्त्यावर पाठवायचे आहेत. 30 नोव्हेंबर 2023 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.