Mumbai Crime : महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर (Mumbai International Airport) ड्रग्ज रॅकेटचा (Drugs Racket) पर्दाफाश केला आहे. डीआरआयकडून (DRI) तीन परदेशी महिला प्रवाशांना अटक करण्यात आली आहे. डीआरआयने या महिलांकडून 5.68 कोटी रुपयांचे कोकेन जप्त केले आहे. छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर सॅनिटरी पॅडमधून (sanitary pads) कोकेनची तस्करी करणाऱ्या तीन आफ्रिकन महिलांना अटक केल्याने खळबळ उडाली आहे. एका अधिकाऱ्याने शुक्रवारी ही माहिती दिली.
डीआरआय मुंबईच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे, छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर गेल्या तीन दिवसांत केलेल्या कारवाईत, अमली पदार्थांचे एक मोठे नेटवर्क पकडले गेले आहे. या नेटवर्कद्वारे देशात मोठ्या प्रमाणात ड्रग्जची तस्करी करण्यात येत होती. अधिकाऱ्यांनी सांगितले की, या टोळीत सहभागी असलेल्या विदेशी महिला त्यांच्या सॅनिटरी पॅड्स आणि गुदाशयात लपवून ड्रग्ज आणत होत्या. तपासणी केली असता ही धक्कादायक माहिती समोर आली आहे.
डीआरआयच्या मुंबई झोनल युनिटने तीन महिला प्रवाशांकडून एकूण 568 ग्रॅम कोकेन जप्त केले आहे, ज्याची किंमत अंदाजे 5.68 कोटी रुपये आहे. यामध्ये दोन युगांडाच्या आणि एका टांझानियन महिलेला अटक करण्यात आली आहे. पुढील चौकशीसाठी त्यांना विमानतळावरच ताब्यात घेण्यात आले. युगांडातील दोन महिला प्रवाशांनी त्यांच्या सॅनिटरी पॅडमध्ये कोकेन लपवले होते. तर टांझानियन महिलेने गुदाशयात कोकेनने भरलेली कॅप्सूल लपवली होती. तिघांविरुद्ध एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
डीआरआयच्या अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, तिघांना नार्कोटिक ड्रग्स अँड सायकोट्रॉपिक सबस्टन्सेस (एनडीपीएस) कायद्याच्या संबंधित तरतुदींनुसार अटक करण्यात आली आणि त्यांना न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले आहे.
#WATCH | Maharashtra: The Directorate of Revenue Intelligence (DRI) Mumbai officials busted a drug syndicate and arrested three foreign national women passengers & seized a total of 568 grams of cocaine valued at Rs 5.68 crore from their possession. The accused have been taken… pic.twitter.com/iYINMXhgDX
— ANI (@ANI) October 13, 2023
साबणाच्या माध्यमातून 3360 ग्राम ड्रग्सची तस्करी
दरम्यान, मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर महसूल गुप्तचर विभागाने फेब्रुवारी महिन्यात मोठी कारवाई केली होती. अद्दी अबाबाहून मुंबई विमानतळावर येणाऱ्या भारतीय प्रवाशाकडून डीआरआय अधिकाऱ्यांनी 33 कोटी 60 लाख रुपयांचे कोकेन जप्त केले होते. त्याने साबणाच्या स्वरूपात लपवून ठेवलेले 3360 ग्राम ड्रग्ज आणले होते. डीआरआय अधिकाऱ्यांना या प्रवाशावर संशय आला. यानंतर शोध घेण्यात आला. वस्तूंचा शोध सुरू असतानाच अधिकाऱ्यांना साबण आढळून आला. साबणाची तपासणी केली असता त्यात कोकेन आढळून आले.
झडतीदरम्यान अधिकाऱ्यांना एक खोका सापडला होता. हा खोका साबणाचा होता. या कव्हरमध्ये अधिकाऱ्यांना पांढऱ्या रंगाचा साबण दिसला. त्याची अधिक नीट तपासणी केली असता अधिकाऱ्यांच्या हाताला मेण चिकटू लागले. यानंतर अधिकाऱ्यांनी साबण घासण्यास सुरुवात केली. मेण चोळल्यानंतर आत साबणासारखा तुकडा दिसत होता. पण तो साबण नव्हता. योग्य तपास केल्यावर तो साबण नसून कोकेन असल्याचे आढळून आले. कोकेनचे वजन केले असता ते 3360 ग्रॅम असल्याचे आढळून आले. आंतरराष्ट्रीय बाजारात त्याची किंमत अंदाजे 33 कोटी 60 लाख रुपये आहे. आदि अबाबाहून आलेल्या या भारतीय प्रवाशाला डीआरआयच्या अधिकाऱ्यांनी अटक केली होती.