शायनिंग महागात पडली! पासपोर्ट काढताना पत्नीला इम्प्रेस करायला गेला अन्...; थेट तुरुंगात रवानगी

Crime News : आरोपी हा अभियंता असून त्याच्या कृत्याने सर्वांनाच धक्का बसला आहे. तर दुसरीकडे गेल्यावर्षी झालेल्या या प्रकरणात आता आरोपीला अटक करण्यात आली आहे

Updated: Feb 16, 2023, 01:38 PM IST
शायनिंग महागात पडली! पासपोर्ट काढताना पत्नीला इम्प्रेस करायला गेला अन्...; थेट तुरुंगात रवानगी title=

Crime News : प्रत्येक विवाहित स्त्रिला तिच्यावर भरपूर प्रेम करणारा पती भेटावा असं कायमचं वाटतं. दुसरीकडे त्या विवाहीत स्त्रिचा पतीही आपल्या बायकोचा हट्ट पुरवण्यासाठी नेहमीच प्रयत्न करत असतो. कधी कधी नवरोबा सप्राईज देण्यात नादात आपण काय करतोय याचं त्याला भान देखील राहत नाही. असाच काही प्रकार करणं एकाला चांगलंच महागात पडलं आहे (cyber crime). पत्नीला खुश करण्यासाठी या पठ्ठ्याने चक्क मुंबई पोलिसांची (Mumbai Police) वेबसाईट हॅक केली होती. मात्र आता त्याला तुरुंगाची हवा खावी लागणार आहे.

मुंबई पोलिसांनी उत्तर प्रदेशातून आरोपीला घेतले ताब्यात

उत्तर प्रदेशातील गाझियाबादमधील या पतीच्या कृत्याने सर्वांनाच धक्का बसला आहे. गाझियाबादच्या राजा बाबू शाह याने पत्नीचा पासपोर्ट काढण्यासाठी पोलिसांची साइटच हॅक करुन टाकली. पेशाने सिव्हिल इंजिनिअर असलेल्या 27 वर्षीय शाह याला आता मुंबईच्या सायबर पोलिसांनी अटक केली आहे. राजा बाबू शाहने साइट हॅक करत तिघांचे अर्जही मंजूर केले होते. सुट्टीच्या दिवशीही आरोपी बाबू शाहने अर्ज मंजूर केल्याने त्याची ही चूक पकडली गेली आणि तो अडकला.

पत्नीला इंम्प्रेस करणे पडलं महागात

आरोपी राजा बाबूच्या पत्नीला नोकरीसाठी परदेशात जायचे होते. त्यामुळे तिने पोलिसांकडे पासपोर्टसाठी अर्ज केला होता. यावेळी पत्नीला इम्प्रेस करण्यासाठी आरोपी पतीने पोलिसांची वेबसाईट हॅक केली आणि पत्नीचा अर्ज मंजूर केला. कोणाला शंका येऊ नये म्हणून राजा बाबूने आणखी तिघांचे अर्ज मंजूर केले. शाह याच्या पत्नीने पासपोर्टसाठी सादर केलेल्या कागदपत्रांमध्ये कोणतीही अडचण नव्हती. मात्र गुन्हा दाखल झाल्यानंतर बाबू शाह याच्या पत्नीचा पासपोर्ट रोखण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे. आरोपी सध्या न्यायालयीन कोठडीत आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.

सुट्टीच्या दिवशी अर्ज केला अन्...

गेल्या वर्षी याप्रकरणी मुंबईतील आझाद मैदान पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती. अज्ञात व्यक्तीवर विविध कलमे आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत  फसवणूक केल्याच्या आरोपांखाली गुन्हा दाखल करण्यात आला होता. आरोपीने वेबसाईट हॅक करुन त्याच्या पत्नीसह आणखी तिघांचे अर्ज मंजूर केले. 24 सप्टेंबर 2022 रोजी त्याने हा सर्व प्रकार केला होता. मात्र त्या दिवशी सार्वजनिक सुट्टी पोलिसांचे पासपोर्ट संदर्भातील कार्यालय बंद होते. मात्र राजा बाबूच्या कदाचित लक्षात आले नाही आणि तो फसला.

पोलिसांच्या चौकशीत आरोपीने पोलिसांच्या चौकशीसाठी आलेलेले तीन पासपोर्टचे अर्जही मंजूर करुन घेतल्याची माहिती दिली. हे तिन्ही अर्ज मुंबईतील अँटॉप हिल, चेंबूर आणि टिळक नगर येथील होते.  तपासादरम्यान असे आढळून आले की आरोपीने आयपी अॅड्रेसचा वापर केला होता. यानंतर पुढील तपास दक्षिण विभाग सायबर पोलिस ठाण्याकडे सोपवण्यात आला.

दरम्यान, पोलीस उपायुक्त बलसिंग राजपूत आणि सहायक पोलीस आयुक्त रामचंद्र लोटलीकर यांच्या पथकाने उत्तर प्रदेशातील गाझियाबाद येथील राजा बाबू शाह याला अटक केली आहे. शाह हा उत्तर प्रदेशमध्येच भाड्याच्या घरात राहत होता तर त्याची पत्नी मुंबईत राहून काम करत होती. शाहने बेकायदेशीरपणे सिस्टम हॅक करून पत्नीसह तिघांचा पासपोर्टसाठी केलेला अर्ज मंजूर करुन घेतला.