काँग्रेसची 'संविधान बचाओ'ची मुंबईत मोठी रॅली, मोदी सरकारवर हल्लाबोल

 संविधानाचे तुकडे करण्याचे काम हे भाजप सरकार करत आहे, असा हल्लाबोल सुशीलकुमार शिंदे यांनी केला.

Updated: Dec 28, 2019, 03:56 PM IST
काँग्रेसची 'संविधान बचाओ'ची मुंबईत मोठी रॅली, मोदी सरकारवर हल्लाबोल title=
Pic Courtesy: ANI

मुंबई : काँग्रेस पक्षाच्या स्थापना दिनानिमित्त आज पक्षाच्यावतीने मुंबईतल्या ऑगस्ट क्रांती मैदान ते गिरगाव चौपाटी इथल्या लोकमान्य टिळक यांच्या पुतळ्यापर्यंत रॅली काढण्यात आली. 'भारत बचाओ - संविधान बचाओ' या नावाने ही रॅली काढण्यात आली. बाळासाहेब थोरातांच्या नेतृत्वाखाली ही भव्य रॅली काढण्यात आली आहे. यावेळी काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे यांनी भाजपवर जोरदार टीका केली. काँग्रेसच्या शांतता मार्चमध्ये त्यांनी भाजपला चले जावचा इशारा दिला. दिल्लीत जे भाजपचे सरकार बसले आहे. ते सरकार काहीतरी चांगले करतील, असे वाटत होते. मात्र, त्यांनी तसे काहीही केलेले नाही. संविधानाचे तुकडे करण्याचे काम हे भाजप सरकार करत आहे, असा थेट हल्लाबोल शिंदे यांनी केला.

Image

चेन्नईत काढण्यात आलेली काँग्रेसची रॅली. (छाया सौजन्य - एएनआय)

'भारत बचाओ - संविधान बचाओ' या नावाने बाळासाहेब थोरातांच्या नेतृत्वाखाली मोठी रॅली काढण्यात आली. रॅलित मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण, कॉंग्रेस प्रभारी मल्लिकार्जुन खरगे आदी ज्येष्ठ नेत्यांसह प्रणिती शिंदे, अमित देशमुख अशा युवा आमदारांचाही उत्साही सहभाग पाहायला मिळाला. मोर्चात कॉंग्रेसचे अनेक कार्यकर्ते सहभागी झाले होते. ऑगस्ट क्रांती मैदानातून सुरू झालेला मोर्चा गिरगावच्या भवन्स कॉलेजच्या मैदानात सभेत रुपांतर झालं. मोर्चात साधारण आठ ते १० हजार काँग्रेस कार्यकर्ते सामील झाल्याचा अंदाज आहे. 

फ्लॅग मार्चपूर्वी ऑगस्ट क्रांती मैदान इथल्या गोकुळदास तेजपाल हॉल इथे सकाळी १० वाजता ध्वजारोहण करण्यात आले. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली हा मार्च काढला गेला.  यापूर्वी वंचित बहुजन आघाडी आणि भाजपला रॅली काढण्यास परवानगी नाकारली होती. त्यामुळे  काँग्रेसला रॅली काढण्याची परवानगी कशी काय मिळाली, असा सवाल उपस्थित होत आहे.