सत्तास्थापनेसाठी भाजपच्याही हालचाली, मुख्यमंत्र्यांचा निवासस्थानी बैठका

महाराष्ट्रात सरकार स्थापनेच्या दृष्टीनं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी भाजपच्या बैठका सुरू आहेत.

Updated: Oct 26, 2019, 04:59 PM IST
सत्तास्थापनेसाठी भाजपच्याही हालचाली, मुख्यमंत्र्यांचा निवासस्थानी बैठका title=

मुंबई : महाराष्ट्रात सरकार स्थापनेच्या दृष्टीनं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी भाजपच्या बैठका सुरू आहेत. तर येत्या ३० ऑक्टोबरला भाजपच्या नवनिर्वाचित आमदारांची बैठक विधिमंडळ भाजप कार्यालयात बोलावण्यात आली आहे. या बैठकीत भाजपचा विधिमंडळ नेता निवडण्यात येणार आहे, अशी माहिती भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे.

यंदाच्या विधानसभा निवडणुकीत भाजपाला अपेक्षित यश मिळालं नाही. त्याबाबतचं आत्मचिंतन करतानाच, शिवसेनेबरोबर सत्ता स्थापन करण्याबाबतची रणनीती या बैठकांमध्ये ठरवली जात असल्याची, माहिती भाजप सूत्रांनी दिली आहे. काही हमखास निवडून येणाऱ्या जागांवर भाजपचा पराभव  झाला. तसंच अनेक ठिकाणी निकालांचे अंदाज चुकले. बहुतेक ठिकाणी लोकसभेच्या तुलनेत भाजपचे मताधिक्यही कमी झाले. अगदी मुख्यमंत्री फडणवीस यांचंही मताधिक्य घटलं. निवडणुकीत नेमकं काय चुकलं, उमेदवार पराभूत होण्याची कारण काय, यादृष्टीनं या बैठकांमध्ये मंथन सुरू असल्याचं समजतं आहे.

दुसरीकडे ५०-५० फॉर्म्युलासाठी शिवसेनाही आक्रमक झाली आहे. अडीच-अडीच वर्षे मुख्यमंत्रिपद आणि निम्मे मंत्रिपदं शिवसेनेला देण्यात यावी, असा फॉर्म्युला लोकसभेपूर्वी भाजपा अध्यक्ष अमित शाह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत ठरलेला असल्याचं, उद्धव ठाकरेंनी मातोश्रीवरील बैठकीत सांगितलं आहे, अशी माहिती शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी दिली आहे. त्यामुळे ठरलेल्या फॉर्म्युल्यावर भाजपा अंमलबजावणी करत नाही तोपर्यंत कोणताही निर्णय होणार नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. शिवसेनेच्या या आक्रमक भूमिकेवरही भाजपच्या या बैठकीमध्ये चर्चा होईल, हे निश्चित आहे.