धक्कादायक ! केईएम रुग्णालयातही मृतदेहाशेजारीच कोरोना रुग्णांवर उपचार

सायन रुग्णालयातील 'त्या' प्रकाराची पुनरावृत्ती

Updated: May 10, 2020, 07:40 AM IST
धक्कादायक ! केईएम रुग्णालयातही मृतदेहाशेजारीच कोरोना रुग्णांवर उपचार  title=
संग्रहित छायाचित्र

मुंबई : Coronavirus कोरोना व्हायरसचं थैमान आणि संपूर्ण जगावर असणारं हे संकट दिवसागणिक अधिक बळावत असतानाच आता त्याबाबतची एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोना रुग्णांची संख्या असून, यामध्ये मुंबईत कोरोनाबाधितांचा आकडा अतिशय झपाट्याने वाढत आहे. मोठ्या संख्येने कोरोना रुग्णांवर उपचारही सुरु आहेत. पण, रुग्णालय प्रशासनाकडून उपचारांच्या बाबतीत मात्र हलगर्जीपणा केला जात असल्याची धक्कादायक बाब पुन्हा एकदा समोर आली आहे. 

काही दिवसांपूर्वीच सायन रुग्णालयातील एका व्हिडिओनं कोरोनाबाधितांवरील उपचारांमध्ये असणारा हलगर्जीपणा उघड केला होता. त्यामागोमागच आता मुंबईतील परळ येथे असणाऱ्या केईएम रुग्णालयातही असाच प्रकार घडत असल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. सायननंतर केईएम रूग्णालयातही वॉर्ड क्रमांक २० A मध्ये मृतदेहांशेजारीच कोरोना रूग्णांवर उपचार सुरु आहेत. 

केईएम रूग्णालय प्रशासनाचा अक्षम्य हलगर्जीपणाच एका व्हिडिओतून समोर आला आहे. मुख्य म्हणजे कोरोना विषाणूची लागण झालेल्या रुग्णांमध्ये सोशल डिस्टन्सिंग आणि इतरही बाबतीत विशेष काळजी घेण्याचे आदेश आहेत. पण, इथे मात्र कशाचीही तमा न बाळगता रुग्णांचा जीव धोक्यात घातला जात असल्याचं पाहायला मिळत आहे. या व्हिडिओबाबतची अधिकृत आणि सविस्तर माहिती प्रतिक्षेत आहे. तेव्हा आता या प्रकरणी मुंबई मनपाने नवे पालिका आयुक्त इक्बालसिंह चहल त्यांच्या धडक कारवाईच्या सत्राअंतर्गत काही कठोर मार्ग काढणार का याकडेच सर्वांचं लक्ष आहे. 

 

वाचा : 'भारतीयांनी ऑफिसमध्ये जास्तवेळ काम केले तर अर्थव्यवस्था पटकन उभारी घेईल'

सायन रुग्णालयात काय घडलं होतं? 

मुंबईच्या सायन रुग्णालयात मृतदेहांशेजारीच कोरोना रुग्णांवर उपचार सुरु असल्याचा व्हीडिओ व्हायरल झाल्यानंतर माजी खासदार किरीट सोमय्या यांनी भारतीय वैद्यक संशोधन परिषदेकडे (ICMR) तक्रार केली होती. या व्हिडिओमध्ये कोरोना रुग्णांच्या वॉर्डमधील धक्कादायक चित्र दिसून आलं होतं. जिथे कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांचे मृतदेह प्लॅस्टिकच्या पिशव्यांमध्ये गुंडाळून ठेवल्याचं दिसून आलं. त्याच ठिकाणी बाजूच्या खाटांवर मृतदेह असताना इतर रुग्णांवरही उपचार सुरु होते. काही रुग्णांचे नातेवाईकही वॉर्डमध्ये ये-जा करत होते. हा व्हीडिओ समोर आल्यानंतर मोठी खळबळ उडाली होती.