आताची मोठी बातमी! समीर वानखेडेंची 5 तास सीबीआय चौकशी, निलंबनाची कारवाई होण्याची शक्यता

एनसीबीचे (NCB) माजी झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्या अडचणी वाढतच चालल्या आहेत. सीबीआय चौकशीनंतर समीर वानखेडे यांच्यावर निलंबनाची कारवाई होण्याची शक्यता आहे.

गणेश कवाडे | Updated: May 20, 2023, 05:00 PM IST
आताची मोठी बातमी! समीर वानखेडेंची 5 तास सीबीआय चौकशी, निलंबनाची कारवाई होण्याची शक्यता title=

Sameer Wankhede CBI Inquiry : एनसीबीचे (NCB) माजी झोनल डायरेक्टर समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्या अडचणीत आता आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.  आज सीबीआयमार्फत (CBI) त्यांनी तब्बल 5 तास चौकशी झाली. पहिल्या सत्रात वानखेडेंची सुमारे तीन तास चौकशी करण्यात आली.  त्यानंतर दुसऱ्या सत्रात त्यांची दोन तास चौकशी करण्यात आली. सीबीआयने गुन्हा दाखल केल्यानंतर आता याच अहवालाच्या आधारे वानखेडे यांची विभागीय चौकशी सुरू झाली असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. त्यातच आता समीर वानखेडे यांच्यावर निलंबनाची (Suspension) कारवाई होण्याची शक्यता सूत्रांनी दिली आहे. एखाद्या अधिकाऱ्यावर जेव्हा गुन्हा दाखल होतो, तेव्हा त्याच्यावर निलंबनाची कारवाई केली जाते.

25 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप
आर्यन खान ड्रग्स प्रकरणी (Aryan Khan Drug Case) समीर वानखेडेंनी शाहरुख खानकडे (Shah Rukh Khan) 25 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप आहे. सीबीआयने याआधी वानखेडेंच्या घरावरही छापा मारला होता. तसंच चौकशीसाठी समन्स बजावलं होतं. मात्र वानखेडेंनी मुंबई हायकोर्टात (Mumbai High Court) धाव घेतली होती. आगामी सुनावणीपर्यंत वानखेडेंना अटक करू नये, असे आदेश हायकोर्टानं दिलेत. याप्रकरणी पुढील सुनावणी येत्या 22 मे रोजी होणाराय. 

दरम्यान, भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे सीबीआयच्या रडारवर असलेले एनसीबीचे माजी विभागीय संचालक समीर वानखेडे यांनी शाहरूखबाबत मोठा गौप्यस्फोट केलाय. त्यांनी आपल्या याचिकेत आर्यन खान एनसीबीच्या कोठडीत असताना शाहरूख सोबत झालेल्या व्हॉट्सअप चॅटची माहिती दिलीय. 

वानखेडे-शाहरुखमधला चॅट
तुम्ही केलेल्या मार्गदर्शनाबाबत मी तुमचे आभार मानतो 

धन्यवाद! तुम्ही भले व्यक्ती आहात. मी विनंती करतो 
कृपया आर्यनवर दया दाखवा 

तुम्ही जिथे सांगाल तिथे मी तुम्हाला पर्सनली भेटायला येईल आणि मिठी मारेन.
कृपया तुमच्या सोयीचं ठिकाणी सांगा. 

तुम्ही करत असलेल्या मदतीसाठी मी कायम ऋणी राहणार.

मी भीक मागतो. आर्यनला जेलमध्ये जाऊ देऊ नका. नाहीतर काही वाईट लोकांमुळे
तो आयुष्यातून उठेन. त्याचा दोष नाही. काही लोकं स्वार्थापोटी बोलत आहेत. मात्र मी 
त्यांच्याकडे जाऊन भीक मागेन आणि तुमच्याविरोधात बोलण्यापासून त्यांना रोखेन. 
त्यासाठी मी सारी शक्ती पणाला लावेन. पण कृपया माझ्या मुलाला घरी पाठवा. 
मी एक बाप म्हणून भीक मागतो. 

ही एका बापाची एका बापाला विनंती आहे. जसं तुमचं तुमच्या मुलांवर प्रेम आहे 
तसंच माझं माझ्या मुलांवर प्रेम आहे. आणि दोन बापांच्या भावनांमध्ये बाहेरचा कुणीही येऊ शकत नाही. 

मी सभ्य आणि दयाळू माणूस आहे समीर. कृपया माझ्या विश्वासाला तडा जाऊ देऊ नकोस.
नाहीतर आमचं कुटुंब उद्ध्वस्त होईल. 

वानखेडेंच्या या गौप्यस्फोटावर शाहरूखनं कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. आर्यन खान अटकेत होता त्यावेळीही शाहरूखनं माध्यमांसमोर येणं टाळलं होतं. शाहरूखचं मौन आणि आता वानखेडेंनी समोर आणलेलं व्हॉट्सअप चॅट यामुळे या प्रकरणात आता नवा ट्विस्ट आलाय. मात्र सर्वांचं लक्ष लागलंय ते शाहरूखकडे. आर्यनच्या प्रकरणावर शाहरूख आता तरी मौन सोडणार का?