Mhada CIDCO Lottery : म्हाडा, सिडकोसह इतर कोणत्याही सरकारी योजनेत दुसरे घर घेणे आता अशक्य होणार आहे. त्यामुळे सरकारी योजनेतील घरांचे लाभार्थी तुम्ही एकदाच होऊ शकतात. म्हणजे जर तुम्ही सरकारी योजनेचे लाभार्थी असतानाही आगामी सोडतीत सहभागी होऊन घराचे लाभार्थी ठरल्यास, लाभार्थ्यांवर कडक कारवाई केली जाणार आहे. तसेच सोडतीत लागलेल्या घराचे वितरण रद्द करण्यात येणार आहे. यासंबंधीच्या राज्य सरकारच्या 2019 च्या आदेशाची कठोर अंमलबजावणी म्हाडाने करण्याचा निर्णय घेतला आहे.
म्हाडा आणि सिडकोची घरे अनेकांना लागली आहेत. मात्र, यात मुंबईत आणि नवी मुंबईतही एकाच व्यक्तीला घरे लागली आहेत. काहींकडे सरकारी योजनेतील दोन दोन घरे आहेत. तसेच विविध सरकारी योजनांतून एकाच वेळी एकापेक्षा अधिक घरांचा लाभ घेणाऱ्यांची संख्या वाढत असल्याचे समोर आले आहे. या पूर्वी कोकण मंडळाच्या सोडतीतील लाभार्थी असलेली व्यक्ती पुणे मंडळ वा इतर मंडळाच्या सोडतीतही सहभागी होऊन घर घेऊ शकत होती. तर, सिडकोच्या योजनेतील लाभार्थी मुंबई मंडळ, कोकण मंडळ वा म्हाडाच्या इतर मंडळाच्या सोडतीद्वारेही घर घेऊ शकत होते. त्यामुळे एक व्यक्ती दुहेरी लाभ घेत होती. अशा अनेकांनी अशी घरे घेतली आहेत. मात्र, आता अशी घरे घेता येणार नाहीत. तसा नियम करण्यात आला आहे.
म्हाडा, सिडको किंवा इतर कोणत्याही सरकारी योजनेतील एका कुटुंबाला एकच घर घेता येईल, यासंबंधीचा शासन निर्णय 11 सप्टेंबर 2019 रोजी जारी करण्यात आला आहे. या आदेशाची अंमलबजावणी प्रभावीपणे झालेली नव्हती. आता मात्र या आदेशाची कडक अंमलबजावणी करण्यात येणार आहे.
मुंबईतील घरांच्या सोडतीची प्रतीक्षा संपली असून 4083 घरांसाठी 22 मे रोजी जाहिरात प्रसिद्ध केली जाणार आहे. एकूण घरे 4083 असणार आहेत. यात अत्यल्प - 2788, मध्यम- 132, उच्च - 38, विखुरलेली - 102 अशी घरे असणार आहेत. जाहिरात 22 मे रोजी प्रसिद्ध होणार आहे. त्याच दिवसापासून नोंदणी करता येणार आहे. अनामत रक्कमेसह अर्ज भरण्याची अंतिम तारीख 26 जून आहे. तर सोडतीचे ठिकाण रंगशारदा, वांद्रे, पश्चिम आहे. घरांची सोडत 18 जुलै 2023 रोजी काढण्यात येणार आहे.
मुंबईतील घरांसाठी अर्ज भरण्याची अंतिम मुदत ही 26 जूनपर्यंत आहे. त्यानंतर स्वीकृती अर्जांची छाननी करण्यात येणार आहे. त्यानंतर पात्र अर्जदारांची यादी जाहीर केली जाईल.अल्प गटासाठी गोरेगाव येथे घरे आहेत. अल्प गटातील घरांच्या किमती साधारण 30 ते 40 रुपयांपर्यंत आहेत. तर पहाडी भागातील घरांची किंमत साधारण 30 ते 44 लाखांच्या घरात असण्याची शक्यता आहे. मध्यम गटासाठी 132 घरे असून ही घरे दादर, टिळक नगर (चेंबूर), सहकार नगर (चेंबूर) कांदिवली येथील आहेत. तसेच उच्च गटासाठी 39 घरे असून ही घरे ताडदेव, लोअर परळ, शीव (सायन), शिंपोली, तुंगा पवई येथे आहेत. 18 जुलै रोजी सोडत काढण्यात येणार आहे.
दरम्यान, राज्यातल्या सरकारी कार्यपद्धतीत आता आमुलाग्र बदल होणार आहे. कारण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुशासन प्रणाली 2023 ला मान्यता दिली आहे. तेव्हा सरकारी कार्यालयांचं कामकाज आता आणखी गतिमान आणि पारदर्शक होणार आहे, असा दावा करण्यात आला आहे. तब्बल सहा दशकांनंतर म्हणजे 60 वर्षानंतर सरकारी कार्यालयांमध्ये हा मोठा बदल होणार आहे. सामान्यांच्या समस्या आणि सरकारी कार्यपद्धतीची सांगड घाला. तसेच अन्य राज्यांसाठी आदर्श ठरणारी नियमावली तयार करण्याचे आदेश मुख्यमंत्री शिंदे यांनी दिलेत.