पुण्यानंतर मुंबईतही हिट अँड रन, अल्पवयीन मुलाच्या दुचाकीनं धडक दिल्यामुळे एकाचा मृत्यू

मुंबईत एका 15 वर्षीय अल्पवयीन मुलाने 32 वर्षीय तरुणाला व्यक्तीला धडक दिली आहे. या अपघातात 32 वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

नम्रता पाटील | Updated: May 24, 2024, 12:36 PM IST
पुण्यानंतर मुंबईतही हिट अँड रन, अल्पवयीन मुलाच्या दुचाकीनं धडक दिल्यामुळे एकाचा मृत्यू title=

Mumbai Road Accident : पुण्यातील कल्याणी नगर परिसरात पोर्शे कार चालवत असलेल्या 17 वर्षीय अल्पवयीन मुलाने एका दुचाकीला धडक दिली होती. या भीषण अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला होता. एकीकडे पुण्यातील हिट अँड रन प्रकरण चर्चेत असताना मुंबईतही अशाच प्रकारचा एक भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. मुंबईत एका 15 वर्षीय अल्पवयीन मुलाने 32 वर्षीय तरुणाला व्यक्तीला धडक दिली आहे. या अपघातात 32 वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

मुंबईतील माझगाव परिसरात गुरुवारी (23 मे) एक भीषण अपघात घडला. यात एका 15 वर्षीय अल्पवयीन मुलाने दुचाकीनं एका 32 वर्षीय तरुणाला धडक दिली आहे. या दुचाकीच्या धडकेत 32 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. गुरुवारी सकाळी सातच्या सुमारास हा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, एक 15 वर्षांचा मुलगा माझगाव डॉक सर्कल येथून नेसबीट ब्रीज मार्गे जे जे रोडच्या दिशेने येत असताना त्याच्या विरुद्ध दिशेने येणाऱ्या दोन बाईकची धडक झाली. या घटनेत इरफान नवाब अली शेख (32) नावाचा व्यक्ती गंभीर जखमी झाला. या अपघातानंतर त्या व्यक्तीला तात्काळ भायखळा येथील जे जे रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. पण उपचारादरम्यान त्या व्यक्तीचा मृत्यू झाला.

वडील पोलिसांच्या ताब्यात

याप्रकरणी मुंबईतील जे. जे मार्ग पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मुंबईतील रस्ते अपघातात एका व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर पोलिसांनी याप्रकरणी कारवाई केली आहे. जे जे मार्ग पोलिसांनी अल्पवयीन मुलासह त्याचे वडील जावेद शफीक अहमद शेख यांना ताब्यात घेतलं आहे. या घटनेनंतर जे जे मार्ग पोलिसांनी आयपीसीच्या कलम 304(2) आणि मोटार वाहन कायद्याच्या कलम 3, 4 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. 

पुण्यात रविवारी भीषण अपघात 

दरम्यान रविवारी (19 मे) रोजी पुण्यात एका 17 वर्षाच्या मुलाने दुचाकीवरुन जाणाऱ्या दोन इंजिनिअर्सना त्याच्या पोर्शे कारने चिरडलं होतं. कार चालवणारा अल्पवयीन दारुच्या नशेत होता. या भीषण रस्ते अपघातात दोन्ही इंजिनिअर्सचा मृत्यू झाला. अनिश अवधिया (24 वर्ष) आणि अश्विनी कोष्टा (24 वर्ष) अशी मृतांची नावं आहेत. हे दोघेही मध्य प्रदेशातील रहिवासी असून पुण्यात कामाला होते. या प्रकरणी आरोपीचे वडिल विशाल अग्रवालला 24मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. तर या अपघाताला कारणीभूत ठरलेल्या अल्पवयीन मुलाचा जामीन  बाल हक्क न्यायालयाने रद्द  केला आहे. त्या मुलाची बाल सुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे.