घोडबंदर रोडवर आजपासून 6 जूनपर्यंत 'या' वाहनांना नो एन्ट्री! हे वाचाच नाहीतर ट्रॅफिक जॅममध्ये अडकून पडाल

Thane Traffic Update: ठाणे वाहतूक पोलिसांनी यासंदर्भातील माहिती जारी केली आहे. सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या मार्गांपैकी एक असलेल्या घोडबंदरवरील हा बदल 6 जूनपर्यंत कायम राहणार आहे.

स्वप्निल घंगाळे | Updated: May 24, 2024, 10:03 AM IST
घोडबंदर रोडवर आजपासून 6 जूनपर्यंत 'या' वाहनांना नो एन्ट्री! हे वाचाच नाहीतर ट्रॅफिक जॅममध्ये अडकून पडाल title=
ठाणे पोलिसांनी जाहीर केला वाहतुकीतील बदल

Thane Ghodbander Road Traffic Update : महाराष्ट्रातून गुजरातला जाण्यासाठी महत्त्वाच्या मार्गांपैकी एक असलेला घोडबंदर रोड पुढील काही दिवस बंद राहणार आहे. घोडबंदर रोडवरील गायमुख घाटातील 700 मीटर लांबीच्या रस्त्याची दुरुस्ती केली जणार आहे. या रस्त्याचं डांबरीकरण करण्याचं काम आजपासून (24 मे 2024) सार्वजनिक बांधकाम विभागाने हाती घेतलं आहे. याच कारणामुळे ठाणे वाहतूक पोलिसांनी या मार्गावर 6 जूनपर्यंत अवजड वाहनांना बंदी घालण्याचा निर्णय जाहीर केला आहे. या दुरुस्तीच्या कमांचा अवाका पाहता पुढील काही दिवस ठाणे, घोडबंदर, मुंबई-अहमदाबाद मार्गावर मोठ्याप्रमाणात वाहतूककोंडी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. 

मोठ्या प्रमाणात मालवाहतूक अन् प्रवासी वाहतूक

घोडबंदर रोड हा राज्याबाहेर रस्ते मार्गाने माल वाहून नेणाऱ्या ट्रकसाठी प्रमुख मार्गांपैकी एक आहे. मुंबई, गुजरात, भिवंडी आणि उरणमधील जेएनपीटी बंदरातून गुजरात मार्गावर माल वाहून नेणारी हजारो वाहने घोडबंदर रोडवरुन जातात. अवजड वाहनांबरोबरच मुंबई, वसई, विरार, भाईंदरमधील छोट्या वाहनांकडूनही मोठ्या प्रमाणात या रस्त्याचा वापर केला जातो. बोरीवली, मिरा-भाईंदरकडे जाणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाबरोबरच नवी मुंबई आणि ठाणे महानगरपालिकेच्या परिवहन सेवेतील बसही याच मार्गाने जातात. त्यामुळे या मार्गावरुन प्रवाशांची ये-जा सुद्धा मोठ्या प्रमाणात होते.

हलक्या वाहनांना परवानगी

24 मे ते 6 जूनदरम्यान या मार्गावर अवजड वाहनांना प्रवेशबंदी असली तरी हलक्या वाहनांची वाहतूक मार्गावरून सुरू राहणार असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. दुरुस्ती सुरु असतानाही येथील वाहतूक सिंगल लेन पद्धतीने सोडली जाण्याची शक्यता आहे. घोडबंदर मार्गावरील घाटाजवळचा रस्ता हा अत्यंत अरुंद आहे. त्यामुळे एकाचवेळी अवजड वाहने आणि हलक्या वाहनांचा भार वाढल्यास ठाणे, घोडबंदर आणि मुंबई-अहमदाबाद मार्गावर वाहनांच्या रांगा लागू शकतात.

24 मे ते 6 जूनदरम्यानच्या अवजड वाहनांसाठी वाहतुकीतील बदल खालीलप्रमाणे - 

> गुजरातमधून घोडबंदर मार्गे ठाण्याच्या दिशेने येणार्या जड/अवजड वाहनांना चिंचोटी नाक्याजवळ प्रवेशबंदी असेल. ही वाहने चिंचोटी नाका येथून कामन, अंजुरफाटा मानकोली, भिवंडी मार्गाने जातील.

> मुंबई, ठाण्यातून घोडबंदरच्या दिशेने वाहतुक करणाऱ्या जड/अवजड वाहनांना कापूरबावडी चौक आणि माजिवड्याजवळ प्रवेशबंदी असेल. येथील वाहने कापूरबावडी वाहतूक शाखेच्या ऑफिसजवळून खारेगाव टोलनाका, मानकोली, अंजुरफाटा मार्गाने किंवा कशेळी, अंजुरफाटा मार्गे पुढे निघतील.

> मुंब्रा, कळव्यावरुन घोडबंदरच्या दिशेने येणाऱ्या जड/अवजड वाहनांना खारेगाव टोलनाका येथे प्रवेश बंद केला जाईल. ही वाहने खारेगाव खाडी पूलाखालून खारेगाव टोलनाका, मानकोली मार्गे जातील.

> नाशिककडून घोडबंदरच्या दिशेने जाणाऱ्या जड/अवजड वाहनांना मानकोली नाक्यावर प्रवेशबंदी असेल. या वाहनांना मानकोली पूलाखालून अंजुरफाटा मार्गे जावं लागेल.