मुंबईत सुमारे १४ कोटी रुपयांचे २५ लाखांहून अधिक मास्क जप्त

कोरोनाचे संकट असताना सॅनिटायझर आणि मास्कचा तुटवडा जाणवू लागला. तसेच काळाबाजारही सुरु झाला.  

Updated: Mar 24, 2020, 06:13 PM IST
मुंबईत सुमारे १४ कोटी रुपयांचे २५ लाखांहून अधिक मास्क जप्त title=

मुंबई : कोरोनाचे संकट असताना सॅनिटायझर आणि मास्कचा तुटवडा जाणवू लागला. तसेच काळाबाजारही सुरु झाला. राज्य सरकार आणि केंद्र सरकारने तात्काळ पावले उचलले तरीही काळाबाजार सुरुच होता. चढ्या दराने याची विक्री करण्यात येत होती. दरम्यान, आज मुंबईत शहरात सुमारे १४  कोटी रुपयांचे २५ लाखांहून अधिक मास्क जप्त करण्यात आले आहे. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने ही कारवाई केली आहे. 

कोरोनाला रोखण्यासाठी मास्कची मोठ्या प्रमाणात गरज असताना, मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने आज मोठी कारवाई करत अंधेरीतल्या सहार भागातून २५ लाखांहून अधिक मास्क जप्त केले. सुमारे १४ कोटी रुपयांचे हे मास्क आहेत. या प्रकरणी पोलिसांनी चार जणांना अटक केली आहे. मास्कची साठवणूक आणि काळा बाजार करणाऱ्यांवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्याची मागणी माजी मंत्री आणि भाजप आमदार आशिष शेलार यांनी केली आहे.

राज्यात कोरोना रुग्णांचा आकडा वाढत आहे. त्यामुळे चिंता व्यक्त करण्यात येत आहे. कोरोनाचा फैलावर जास्त होत असल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे राज्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. जिल्ह्याच्या सिमाही बंद करण्यात आल्या आहेत. घरातून कोणीही बाहेर पडू नये, असे आवाहन वेळोवेळी राज्य सरकारकडून करण्यात येत आहे. अशावेळी एक चांगली बातमी हाती आली आहे. कोरोनाचे रुग्ण बरे होत आहेत, अशी महत्त्वाची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. कोरोनाचे रुग्ण वाढत असले तरी दुसरीकडे रुग्णालयात दाखल असलेले रुग्ण बरे होत आहेत ही समाधानाची बाब आहे. सध्या दोनच कोरोनाबाधितांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरु असून बाकी सर्व रुग्णांची प्रकृती स्थिर आहे, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणालेत.

राज्यातील कोरोनाबिधातांची संख्या १०६ वर पोहोचली आहे. त्यामुळे चिंता व्यक्त करण्यात येत आहे. आरोग्य मंत्र्यांनी समाजमाध्यमातून ही माहिती दिली आहे. दरम्यान, मुंबई मध्ये कर्फ्यूची पाहणी करताना काही लोक अनावश्यकच घराबाहेर हिंडताना आढळले. ‌त्यांना समज देऊन घरी परतायला सांगावं लागतंय ही खेदाची बाब आहे. कोरोना चे गांभीर्य सर्वांनी लक्षात घ्यायला हवे आणि जे कायद्याचे उल्लंघन करतील अशांविरुद्ध पोलिसांना कठोर कारवाईचे निर्देश दिले आहेत, अशी माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे.