खुशखबर! मुंबईकरांची पाण्याची चिंता मिटली, पाहा तलावात किती पाणीसाठा

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांपैकी चार तलाव भरुन वाहू लागले आहेत. त्यामुळे मुंबईकरांची पाण्याची चिंता मिटली आहे. गेले काही दिवस मुंबईत मुसळधार पाऊस कोसळतो. तलाव क्षेत्रातही मुसळधार पाऊस कोसळत असल्याने तलावांमधल्या पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. 

Updated: Jul 28, 2023, 05:26 PM IST
खुशखबर! मुंबईकरांची पाण्याची चिंता मिटली, पाहा तलावात किती पाणीसाठा title=

मुंबई : मुंबईसह राज्यात गेल्या काही दिवसात मुसळधार पाऊस  (Heavry Rain) कोसळतोय. यंदा पावसाला काहीशी उशीराने सुरुवात झाली, जूनमध्ये पावसाचं प्रमाण कमी होतं पण जुलै महिन्यात पावसाने दमदार हजेरी लावली. मुंबईला पाणीपुरवठा (Water Supply) करणाऱ्या तलाव क्षेत्रात गेल्या काही दिवसात सातत्याने कोसळणाऱ्या पावसाने तलाव (Lake) भरुन वाहू लागले आहेत. यामुळे मुंबईकरांची पाण्याची चिंता मिटली आहे. 

मुंबईच्या तलावांची काय स्थिती?
बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांना दररोज सुमारे 385 कोटी लीटर (3850 दशलक्ष लीटर) एवढा पिण्याच्या शुद्ध पिण्याच्या पाण्याचा पुरवठा नागरिकांना केला जातो. हा पाणीपुरवठा ज्या 7 तलावांमधून केला जातो, त्यापैकी मोडक-सागर तलाव हा गुरूवारी म्हणजे 27 जुलै 2023 रोजी रात्री 10.52 वाजता ओसंडून वाहू लागला. बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्राला पिण्याच्या पाण्याचा पाणीपुरवठा करणाऱ्या 7 तलावांपैकी मोडक-सागर हा तलाव भरुन ओसंडून वाहू लागणारा यंदाच्या पावसाळ्यातील चौथा तलाव ठरला आहे. या तलावाची कमाल पाणी साठवण ही 12,892.5 कोटी लीटर (1,28,925 दशलक्ष लीटर) इतकी आहे, अशी माहिती बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या जल अभियंता खात्याद्वारे देण्यात आली आहे.

मोडक-सागर तलाव गेल्या वर्षी म्हणजेच सन 2022 मध्ये 13 जुलै रोजी दुपारी 1.०4 वाजता ओसंडून वाहू लागला होता. तर त्यापूर्वी म्हणजेच 2021 मध्ये 22 जुलै रोजी मध्‍यरात्री 3.24 वाजता, वर्ष 2020 मध्‍ये 18 ऑगस्‍ट रोजी रात्री 9.24 वाजता, वर्ष 2019 मध्ये 26 जुलै रोजी भरुन वाहू लागला होता. तर त्यापूर्वी 2018 आणि 2017 असे दोन्ही वर्ष हा तलाव 15 जुलै तर 2016 मध्ये 1 ऑगस्ट रोजी पूर्ण भरुन वाहू लागला होता.

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या 7 धरणांची एकूण पाणी साठवण क्षमता ही सुमारे 1.44,736.3 कोटी लीटर (14,47,363 दशलक्ष लीटर) इतकी आहे. सर्व तलावांमध्‍ये आज पहाटे 6.00 वाजता करण्यात आलेल्या मोजणीनुसार सर्व सातही तलावांमध्‍ये 98,513 कोटी लीटर (9,85,130 दशलक्ष लीटर) इतका म्हणजेच 68.06 टक्‍के इतका पाणीसाठा आहे.

यंदाच्‍या पावसाळयात तुळशी तलाव हा भरून वाहू लागलेला पहिला तलाव ठरला आहे. विहार तलाव आणि तानसा तलाव हे बुधवारी 26 जुलै रोजी भरून वाहू लागले आहेत. तर, काल रात्री उशिरा भरून वाहू लागलेल्‍या मोडक-सागर तलाव हा यंदाच्‍या मोसमातील भरून वाहू लागलेला चौथा तलाव ठरला आहे.