'संभाजी भिडे विकृती, त्यांचा बंदोबस्त करा,' विरोधकांच्या मागणीवर CM शिंदे स्पष्टच बोलले 'गांभीर्य पाहून...'

Sambhaji Bhide: श्री शिवप्रतिष्‍ठान हिंदुस्‍थान संस्‍थेचे संस्‍थापक मनोहर ऊर्फ संभाजी भिडे (Sambhaji Bhide) यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी (Mahatma Gandhi) यांच्याबाबत केलेल्या वादग्रस्त विधानाचे पडसाद विधानसभेत उमटले आहेत. विरोधक आक्रमक झाले असून त्यांच्या अटकेची मागणी केली जात आहे. दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही कारवाईचं आश्वासन दिलं आहे.   

शिवराज यादव | Updated: Jul 28, 2023, 02:41 PM IST
'संभाजी भिडे विकृती, त्यांचा बंदोबस्त करा,' विरोधकांच्या मागणीवर CM शिंदे स्पष्टच बोलले 'गांभीर्य पाहून...' title=

Sambhaji Bhide: श्री शिवप्रतिष्‍ठान हिंदुस्‍थान संस्‍थेचे संस्‍थापक मनोहर ऊर्फ संभाजी भिडे (Sambhaji Bhide) यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी (Mahatma Gandhi) यांच्याबाबत केलेल्या वादग्रस्त विधानाचे पडसाद विधानसभेत उमटले. महात्मा गांधी यांचे पूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी हे सांगितले जाते. पण करमचंद गांधी हे मोहनदास यांचे वडील नसून एक मुस्लीम जमीनदार हे त्‍यांचे खरे वडील आहेत, असं खळबळजनक विधान संभाजी भिडे यांनी केलं आहे. यानंतर विरोधक आक्रमक झाले असून त्यांच्या अटकेची मागणी केली जात आहे. दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही कारवाईचं आश्वासन दिलं आहे. 

संभाजी भिडे नेमकं काय म्हणाले ? 

महात्मा गांधींचे जे वडील म्हणवले जातात ते करमचंद गांधी हे एका मुस्लिम जमीनदाराकडे कामाला होते. त्या जमीनदाराची मोठी रक्कम चोरून करमचंद गांधी पळून गेले होते. त्यामुळे चिडलेल्या मुस्लिम जमीनदाराने करमचंद गांधी यांची पत्नी म्हणजेच महात्मा गांधीजींच्या आईला पळवून घरी आणले. यानंतर जमीनदाराने त्यांच्यासोबत पत्नीसारखा व्यवहार केला. त्यामुळे करमचंद गांधी हे महात्मा गांधीजींचे खरे वडील नसून ते त्या मुस्लिम जमीनदाराचे पुत्र आहेत. एवढेच नव्हे तर, महात्मा गांधीजींचे शिक्षण आणि सांभाळ त्याच मुस्लिम जमीनदाराने केला. याबाबत माझ्याकडे पुरावे देखील आहे असं संभाजी भिडे अमरावतीमधील सभेत बोलले. 

संभाजी भिडेंना अटक करा - पृथ्वीराज चव्हाण

काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी संभाजी भिडे यांना अटक करण्याची मागणी केली आहे. सभागृहात ते म्हणाले की "संभाजी भिडे नावाच्या एका गृहस्थाने राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबाबत अत्यंत निंदनीय विधान केलं आहे. समाजात तेढ निर्माण करणारं विधान करणाऱ्या अशा व्यक्तीला ताबडतोब अटक केलं पाहिजे. समाजात तणाव निर्माण करण्याचा, दंगली घडवण्याचा हा झालेला पहिला प्रयत्न नाही. अनेक वर्षापासून हे सुरु आहे. राष्ट्रपित्याबद्दल इतकं घृणास्पद विधान केल्यानंतरही ती व्यक्ती बाहेर कशी फिरु शकते. त्याचे पडसाद उटमले तर जबाबदार कोण असणार आहे?". 

संभाजी भिडेंच्या विधानावरुन सभागृहात गदारोळ झाला असताना अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी त्यांचं विधान तपासून योग्य कारवाई करण्याचे निर्देश शासनाला दिले असल्याची माहिती दिली. 

मुख्यमंत्र्यांचं कारवाईचं आश्वासन

अध्यक्षांना दिलेल्या आदेशानुसार योग्य ती कारवाई होईल. त्यांचं विधान तपासलं जाईल. तुम्हीदेखील मुख्यमंत्री राहिले आहात. त्यांचं विधान तपासल्यानंतर गांभीर्य पाहून तपास करु असं आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पृथ्वीराज चव्हाण यांना दिलं. 

भिडेंचा बंदोबस्त करा - बाळासाहेब थोरात

"संभाजी भिडे नावाचा इसम राष्ट्रपित्यावर टीकाटिप्पणी करतो, संपूर्ण देशासाठी लाजिरवाणी गोष्ट आहे सरकारने त्यांचा आजच बंदोबस्त करावा आणि त्या संदर्भात सभागृहात निवेदन करावे," अशी मागणी काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांनी केली आहे. 

थोरात पुढे म्हणाले, "संभाजी भिडे ही विकृती आहे. त्यांनी देशाचे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या संदर्भात अत्यंत अवमानकारक विधान केले आहे जे समग्र देशासाठी अत्यंत अस्वस्थ करणारे आहे. संभाजी भिडे वारंवार असं बोलतात, त्यांना पाठीशी नेमका कोण घालतो याचा शोध घेणे आवश्यक आहे. संभाजी भिडे यांचा हेतू महाराष्ट्राचे वातावरण अस्थिर करण्याचा आहे हे ओळखले पाहिजे. कोणाच्या राजकीय फायद्यासाठी ते वारंवार अशी विधानं करतात? आम्ही सभागृहात संभाजी भिडेंवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. सरकारने आजच या विषयावर कारवाई करावी आणि सभागृहाला सूचित करावे. अन्यथा आम्ही शांत बसणार नाही". 

थोरात म्हणाले, "पुरोगामी विचार संपवण्यासाठी एक यंत्रणा काम करते, असे आमचे स्पष्ट मत आहे. महापुरुष हे सर्वकालीन असतात, त्यांच्या विचारांचे आणि कृतीचे समाजाच्या उभारणीत मोठे योगदान असते. असे असताना हा सततचा खोडसाळपणा सरकारने सहन करू नये. कालही आम्ही क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले यांच्यासंदर्भात बदनामीकारक लिखाण करणाऱ्यावर कारवाईची मागणी केली होती. एकूणच या संपूर्ण प्रकरणात सरकार गंभीर दिसत नाही. भिडेंसारख्या विकृतीवर वेळीच कारवाई केली तर सरकारचा हेतू शुद्ध आहे असे म्हटले जाईल".