Mumbai Monsoon News : पुरे झाला हा उकाडा! मुंबईत कधी दाखल होणार मान्सून? IMD म्हणतं...

Mumbai Monsoon News : मान्सूच्या आगमनाची उत्सुकता आता सर्वत्र पाहायला मिळत असून, वाढत्या उकाड्यामुळं ही प्रतीक्षा आणखी लांबली असल्याचं भासत आहे...  

सायली पाटील | Updated: May 24, 2024, 02:45 PM IST
Mumbai Monsoon News : पुरे झाला हा उकाडा! मुंबईत कधी दाखल होणार मान्सून? IMD म्हणतं... title=
Monsoon might arrive in Mumbai between 10 to 11 June says IMD

Mumbai Monsoon News : अंदमान निकोबार बेटांवर दाखल झालेल्या मान्सूनचा वेग मागील 48 तासांमध्ये काहीसा मंदावला. ज्यामुळं मुंबई आणि उपनगरांमध्ये उकाडा आणखी वाढणार असल्याचा इशारा हवामान विभागानं दिला. शहरातील तापमानवाढ सातत्यानं अडचणी वाढवत असतानाच आता मान्सून महाराष्ट्रात आणि मुंबईत नेमका केव्हा दाखल होणार हाच प्रश्न नागरिकांच्या मनात घर करताना दिसत आहे. भारतीय हवामानशास्त्र विभाग अर्थात आयएमडीनं यासंदर्भातील स्पष्ट माहिती देत मान्सूनच्या मुंबईतील आगमनाची संभाव्य तारीखच आता जाहीर केली आहे. 

31 मे पर्यंत दक्षिणपश्चिम मान्सून केरळात दाखल होणार असल्याची माहिती काही दिवसांपूर्वीच हवामान विभागानं प्रसिद्ध केली होती. ज्यानंतर आता हाच मान्सून 10 किंवा 11 जूनपर्यंत मुंबईत दाखल होणार आहे. दरम्यान, ही मान्सूनच्या आगमनाची संभाव्य तारीख असून, येत्या काळात केरळात मान्सून कसा प्रगती करतो आणि तिथून पुढं जाण्याचा त्याचा वेग किती आहे यावरूनच पुढं मान्सून महाराष्ट्र आणि मुंबईत नेमका केव्हा दाखल होणार यासंदर्भातील अधिकृत तारखेची घोषणा करण्यात येणार आहे. 

हेसुद्धा वाचा : Maharashtra Weather News : मुंबईची होरपळ, कोकण मराठवाड्यात पावसाचा तडाखा; मान्सून राहिला कुठे?

आयएमडीच्या मुंबई विभागाचे अध्यक्ष सुनील कांबळे यांनी एका प्रतिष्ठीत वृत्तसमुहाला दिलेल्या माहितीत मुंबईच्या मान्सूनसंदर्भात ही माहिती दिली. 'सध्या दक्षिणपश्चिम मान्सून अंदमानात दाखल झाला असून, 31 मे रोजी हे मोसमी वारे केरळात दाखल होणार आहे. क्रमश: इथून पुढं मान्सून मुंबईत जून महिन्याच्या 10 किंवा 11 तारखेला दाखल होऊ शकतो', असं ते म्हणाले. मुंबईत मान्सूनच्या आगमनास 3- 4 दिवसांचा विलंबही अपेक्षित असू शकते ही शक्यतासुद्धा त्यांनी स्पष्टच सांगितली. 

मान्सूनच्या मुहूर्ताची तारीख काय? 

आतापर्यंतच्या नोंदींनुसार मुंबईत बहुतांशी 11 जून रोजी मान्सून  दाखल झाल्याचं पाहायला मिळालं आहे. पण, मागील वर्षी मात्र मान्सून जवळपास दोन आठवड्यांनी उशिरानं या शहरात दाखल झाला होता. बिपरजॉय चक्रीवादळाच्या  परिणामामुळं शहराच्या दिशेनं येणाऱ्या मोसमी वाऱ्यांवर हे परिणाम झाल्याचं पाहायला मिळालं होतं. त्यामुळं यंदाच्या वर्षी मान्सून मुहूर्ताची तारीख गाठण्यात यशस्वी ठरतो का, हे पाहणं महत्त्वाचं असेल.