मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कृष्णकुंजवर बोलवलेली मनसे पदाधिका-यांची बैठक संपली आहे. आज सकाळी ११ वाजता सर्व पदाधिका-यांची बैठक बोलवली होती. यात काय मुद्दा मांडला जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.
राज ठाकरे यांनी सर्व पदाधिकाऱ्यांना हॉकर्स झोन आणि नियम याबाबतची प्रत दिली आणि त्याचा अभ्यास करून आपापल्या विभागात हॉकर्स झोन बाबत हरकती सूचना नोंदविण्याचे आदेश दिले आहेत.
फेरीवाला धोरणानुसार राज ठाकरे यांच्या कृष्णकुंज घरासमोरचा आणि मागचा अशा दोन्ही रस्त्यांवर हॉकर्स झोन तयार करण्यात आलाय. दादरमधल्या एम. बी राऊत मार्ग आणि केळूसकर मार्ग या दोन्ही रस्त्यांवर प्रत्येकी १० अशा एकूण २० फेरीवाल्यांसाठी जागा प्रस्तावित करण्यात आलीय.
मात्र, सध्या या दोन्ही रस्त्यावर एकही फेरीवाला बसत नसतांना येथे हॉकर्स झोन तयार करण्याची गरजच काय, असा प्रश्न विचारला जातोय. तसंच या परिसरात शाळा असल्यानं हॉकर्स झोन तयार करण्याच्या नियमावलीचंही उल्लंघन करण्यात आल्याचं मनसे पदाधिकाऱ्यांनी म्हटलंय.
राज ठाकरेंनी एलफिन्स्टन दुर्घटनेनंतर फेरीवाल्यांविरोधी मोहीम सुरू करत फेरीवाल्यांना सळो की पळो करुन सोडलं. यावरुन काँग्रेस आणि मनसेत मोठं राजकारणही रंगलं. मात्र, आता महानगरपालिकेनंच राज ठाकरेंच्या घराबाहेर मुद्दाम फेरीवाल्यांना जागा करुन दिल्याचं बोललं जातंय.