'महाराष्ट्रातले मुख्यमंत्री सध्या शॅडो म्हणूनच काम करतायत'

मुख्यमंत्र्यांच्या कामावर प्रश्नचिन्ह

Updated: Mar 11, 2020, 11:31 AM IST
 'महाराष्ट्रातले मुख्यमंत्री सध्या शॅडो म्हणूनच काम करतायत' title=

मुंबई : अमेय खोपकरांपाठोपाठ मनसे नेता संदीप देशपांडे यांनी देखील ट्विट केलं आहे. 'सामना'तून केलेल्या शॅडो कॅबिनेटच्या टीकेला मनसेकडून प्रत्युत्तर देण्यात आलं आहे. महाराष्ट्रातील किंवा देशातील सध्याच्या विरोधी पक्षाची स्थिती पाहता 'शॅडो' कॅबिनेटचा प्रयोग म्हणजे 'हा खेळ सावल्यांचा' नाट्यप्रयोग ठरू नये अशी टीका सामनामधून मनसेवर करण्यात आली आहे. याला प्रत्युत्तर म्हणून संदीप देशपांडेंनी ट्विट केलं आहे. संदीप देशपांडेंनी ट्विट करून मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे. 

मनसेनं१४व्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात शॅडो कॅबिनेटची घोषणा करण्यात आली. या शॅडो कॅबिनेट मंत्रिमंडळामुळे ठाकरे कुटुंबातील दोन भावांमध्ये सामना बघायला मिळणार आहे. या शॅडो कॅबिनेटवरून शिवसेनेनं मनसेवर टीकेचा बाण सोडला आहे. मात्र यावर पलटवार करत मनसेने मुख्यमंत्र्यांच्या कामावरच बोट ठेवले आहे. ('शॅडो कॅबिनेटच्या नुसत्या घोषणेने रडत राऊतची तंतरली')

मुख्यमंत्री पद अजित दादाच खऱ्या अर्थाने सांभाळत असल्यामुळे खरे मुख्यमंत्री दहा ते पाचच काम करतात.एकही महत्वाच खात नसलेले महाराष्ट्रातले पाहिले मुख्यमंत्री सध्या श्याडो म्हणूनच काम करतायत त्यामुळे श्याडो मुख्यमंत्रीपद देऊन वेळ चा अपव्यय कशासाठी असा विचार राजसाहेबांनी केला असावा

'एकही महत्वाच खात नसलेले महाराष्ट्रातले पाहिले मुख्यमंत्री सध्या श्याडो म्हणूनच काम करतायत त्यामुळे श्याडो मुख्यमंत्रीपद देऊन वेळ चा अपव्यय कशासाठी असा विचार राजसाहेबांनी केला असावा,' अशा शब्दात बोचरी टीका केली आहे.  मनसेचे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी ट्विट करून संजय राऊतांवर निशाणा साधला आहे. 'शॅडो कॅबिनेटच्या नुसत्या घोषणेने रडत राऊतची तंतरली,' असं म्हणतं त्यांना खोचक टोला लगावला आहे. 

काय म्हटलंय 'सामना'त
लोकसभेत अधिकृत विरोधी पक्षनेताच नाही व राज्यात विरोधी पक्ष अद्याप बादशाही भूमिकेतून बाहेर पडायला तयार नाही. 'शॅडो'ची घोषणा करताना त्यांच्या प्रमुख नेत्यांना छाया मंत्रिमंडळास तंबी द्यावी लागली की,'जपून करा, ब्लॅकमेल करण्याचे प्रकार करू नका.' हे बरे झाले. पुन्हा 'शॅडो' वाल्यांचे मुख्यमंत्रीपद रिकामेच आहे. या शॅडो मंत्रिमंडळास शपथ देण्यासाठी एखादा 'शॅडो' राज्यपाल नेमला असता तर योग्य ठरले असते. म्हणजे 'खेळ सावल्यांचा' अधिकच रंगतदार झाला असता. महाराष्ट्रात विनोद शिल्लक आहे. राजकारणात विनोदाला वावडे नाही हे पुन्हा दिसलं.