मुंबई: सध्या सोशल मीडियावर मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी फेसबुकवरून शेअर केलेला एक व्हीडिओ व्हायरल होत आहे. या व्हीडिओत ते मराठी तरुणांना रस्त्यावर उतरुन व्यवसाय करायला लाजू नका, असे आवाहन करताना दिसत आहेत. मनसेचे स्थानिक उपाध्यक्ष नंदू बागलकर यांनी दादरमध्ये रस्त्यावर भाजीचा स्टॉल सुरु केला आहे. या स्टॉलवर जात संदीप देशपांडे यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. तसेच काहीवेळ स्टॉलवर उभे राहून त्यांनी स्वत:ही भाजीविक्री केली. यावेळी त्यांनी हा व्हीडिओ शुट केला आहे. त्यामुळे आता मराठी तरुण या आवाहनाला कितपत प्रतिसाद देणार, हे पाहावे लागेल.
कोरोनामुळ महाराष्ट्राच्या शहरी भागातील परप्रांतीय लोक आणि कामगार आपल्या गावी निघून गेले आहेत. त्यामुळे आता लॉकडाऊननंतर राज्यातील कारखान्यांमध्ये आणि इतर दैनंदिन व्यवसायासाठी मनुष्यबळाचा तुटवडा निर्माण होऊ शकतो. या पार्श्वभूमीवर काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भूमिपुत्रांना ही संधी सोडू नका, असे आवाहन केले होते. महाराष्ट्रातील कारखानदारांना मनुष्यबळाचा तुटवडा भासता कामा नये. त्यासाठी घराबाहेर पडून नोकरी करा, असेही उद्धव ठाकरे यांनी सांगितले होते.
तर दुसरीकडे राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नजीकच्या काळात राज्यात कामगारांची समस्या निर्माण होईल, असा अंदाज व्यक्त केला. अनस्किल्ड कामांसाठी माणसांचा तुटवडा जाणवणार नाही. कारखानदार त्यासाठी कोणालाही कामावर ठेवू शकतील. मात्र, हिरे व्यवसायासारख्या विशेष कौशल्याची गरज असलेल्या क्षेत्रात मनुष्यबळाचा तुटवडा जाणवू शकतो. महाराष्ट्रातून मोठ्याप्रमाणात बंगाली कारगिरांनी स्थलांतर केले आहे. त्यामुळे नजीकच्या काळात महाराष्ट्रापुढे पेच उभा राहू शकतो, अशी भीती देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी 'झी २४ तास'ला दिलेल्या मुलाखतीत व्यक्त केली होती.